Sunday, June 05, 2011

व्रतबंध (पूर्वार्ध)

सिलिब्रेटीज हॉटेलच्या प्रेसिडेन्सी बँके हॉलमध्ये बरीच गर्दी जमली होती. लालचुटुक रंगाची मऊमऊ कुशन्स बसवलेल्या शोभिवंत खुर्च्या हॉलभर मांडून ठेवलेल्या होत्या. त्यातल्या बहुतेक खुर्च्यांवर कोणी ना कोणी विराजमान झालेले होते. त्यात पुरुषांची संख्या तशी कमीच होती. गुढग्याच्याही खालपर्यंत पोचणारी पठाणी शेरवानी परिधान केलेले तीन चार जण सोडल्यास इतरांनी चांगल्यापैकी शर्टपँट घातल्या होत्या. महिलावर्गाची संख्या मोठी होती आणि त्यांच्या वेषभूषेमध्ये अगणित प्रकार होते. उत्तरेतील बनारसीपासून दक्षिणेतल्या कांचीपुरमपर्यंत आणि पश्चिमेतल्या पटोलापासून पूर्वेतल्या आसाम रॉसिल्कपर्यंत सर्व त-हेच्या रेशमी साड्या, शालू, पैठणी वगैरे होत्याच, त्याशिवाय विविध प्रकारच्या भारतीय तसेच परकीय फॅशन्सच्या असंख्य ड्रेसेसचे नमूने पहायला मिळत होते. बहुतेकजणी अंगावर ठेवणीतले निवडक आणि आकर्षक दागिने ल्यायल्या होत्या. सर्वांनी चोपडलेल्या सेंट्सच्या सुवासांच्या मिश्रणातून वातावरणात आगळाच गंध दरवळत होता. सौम्य वाद्यसंगीताच्या मधुर लकेरी हॉलमध्ये घुमत होत्या, त्यातच लोकांच्या बोलण्याचे आवाज मिसळत होते. आपल्या आवाजाचे डेसिबल वाढणार नाही याची काळजी घेऊन प्रत्येकजण हळूहळू फुसफुसत असले तरी सर्वांचा मिळून कलकलाट नसला तरी गलबला होत होता. एका लहानशा गावात आयुष्य घालवून साठपासष्ठ वर्षांपूर्वी निवर्तलेल्या रघुनाथशास्त्र्यांचा आत्मा त्या हॉलच्या आसपास घुटमळत होता.

पणतवंडाच्या मुंजीचा सोहळा पाहण्यासाठी स्वर्गातून त्याला पृथ्वीतलावर पाठवले गेले होते. तो आत्मा त्या जागेच्या शोधात हिंडत होता. एकाद्या घराच्या अंगणात बांबू रोवून आणि त्यावर जाजमाचे छत टाकून मांडव घातला असेल, त्याच्या दारापाशी केळीचे खुंट उभे करून ठेवले असतील, आंब्याची पाने आणि झेंडूची फुले यांच्या माळांचे तोरण बांधले असेल, दारापाशी ताशेवाजंत्री वाजत असतील, आत मंत्रघोष चालला असेल, मांडवात यज्ञकुंडाचा धूर भरलेला असेल आणि मागच्या बाजूला पेटलेल्या चुलखंडांचा. उन्हाने रापलेल्या अंगाचे दर्शन घडवणारे उघडबंब ढेरपोटे आचारी त्यावर अगडबंब हंडे आणि पातेली चढवून त्यात अन्न रांधण्यात मग्न असतील, डोक्यावर शेंडी आणि कमरेला लंगोटी किंवा रेशमी चड्डी धारण केलेले अष्टवर्ग बटू धावपळ करत असतील, मोठी माणसे, विशेषतः त्यांच्या आया त्यांच्यावर ओरडून त्यांना शांतपणे बसायला सांगत असतील, वगैरै वगैरे जे दृष्य रघुनाथशास्त्र्यांच्या आत्म्याला अपेक्षित होते ते गावात कुठेच सापडले नाही. प्रेसिडेन्सी हॉलमध्ये मास्टर क्षितिज याची थ्रेड सेरेमनी आहे असे लिहिलेला बोर्ड सिलिब्रेटीज हॉटेलच्या रिसेप्शनपाशी लावला होता, पण इंग्रजी वाचता येत नसल्यामुळे रघुनाथशास्त्र्यांच्या आत्म्याला त्याचा बोध झाला नाही.

रघुनाथशास्त्र्यांच्या आत्म्याला एक गोष्ट ठाऊक नव्हती. ती म्हणजे जेंव्हा त्यांची मुंज लागली होती त्या वेळी त्यांचे खापरपणजोबा बाळंभटाचा आत्मा असाच गोंधळून गेला होता. वैयक्तिक स्वरूपाच्या या धार्मिक विधीसाठी इतकी माणसे का जमली आहेत याचे त्याला नवल वाटले होते. बारा वर्षांसाठी घरापासून दूर जाणार असलेल्या रघूला बालरूपात पाहून घेण्यासाठी हे लोक जमले आहेत म्हंटले तर त्याच्य़ा वियोगाच्या कल्पनेने गंभीर न होता ते इतक्या आनंदात कसे असू शकतात हे त्याला समजत नव्हते. अंगावर उंची नवे कपडे आणि दागिने, डोक्यावर पागोटे वगैरे घालून घोड्यावर बसलेल्या रघुनाथाची बँडबाजाच्या कर्णकर्कश आवाजात मिरवणुक निघाली. तिला भिक्षावळ असे म्हणतात हे ऐकून त्या आत्म्याला झीटच यायची बाकी राहिली असेल.

No comments: