Friday, November 26, 2010

२६ नोव्हेंबर २००८ (पूर्वार्ध)

त्या दिवशी मी अल्फारेटाला मुलाच्या घरी बसून दुपारचे जेवण घेत होतो. अचानक टेलीफोन वाजला. अजय ऑफीसमधून बोलत होता. मला वाटले तो तिकडे डबा खायला बसला असेल आणि जेवण करता करता त्याला गप्पा मारायच्या असतील. पण तो भेदरलेल्या स्वरात म्हणाला, "तुम्हाला मुंबईचं कांही कळलं का?"
आम्हाला घराबाहेरच्या जगाचं भानच नव्हतं. सांगितलं, "नाही बाबा. काय झालं?"
"तिथे कसलातरी मोठा घोटाळा झालाय्."
एवढ्या मोठ्या मुंबईत लहान सहान दुर्घटना रोजच घडत असतात. त्यांच्याबद्दल वर्तमानपत्रांच्या आतल्या पानांवर बारीक अक्षरात असलेल्या बातम्या न वाचताच ते पान मी अनेक वेळा उलटतो. एकादी इमारत कोसळणे, बस किंवा लोकलचा अपघात, दंगेधोपे, अलीकडल्या काळात होत असलेले बाँबस्फोट यासारख्या मुंबईच्या दृष्टीने मोठ्या असणा-या घटना तिथल्या वृत्तपत्रात मुखपृष्ठावर असतात. पण अल्फारेटाला आल्यापासून रोज सकाळी वर्तमानपत्र वाचणे हा प्रकारच नव्हता आणि कधी न्यूजपेपर आणलाच तर तिथल्या पेपरमध्ये मुंबईतल्या या बातम्या येतहूी नव्हत्या. अधून मधून इंटरनेटवर मुंबईतली वर्तमानपत्रे वाचून त्याची तहान भागवून घेत होतो पण त्यात एवढे समाधान होत नसे. त्यामुळे मुंबईत घडलेल्या अशा मोठ्या घटनासुध्दा अनेक वेळा आम्हाला तिथे समजत नसत. मग मुलाला एवढे अस्वस्थ करणारा हा मोठा गोंधळ कसला असेल? कांही सुचत नव्हते.
पत्नी पटकन म्हणाली, "मी ललिताला फोन करून विचारते."
"नको, नको." अजय जवळजवळ ओरडला. पुढे त्याने सांगितले, "एवढ्याचसाठी मी फोन केला आहे. दोन चार दिवस कोणीही भारतात कोणाला फोन करायचा नाही आणि तिकडून आला तरी कसली चौकशी करायची नाही. घरी आल्यावर मी सांगेन. तोपर्यंत टीव्हीवर पहा, पण ते मलासुध्दा सांगू नका."
आमच्या मनातले गूढ वाढतच होते. लगेच टीव्ही सुरू करून बातम्यांचे चॅनेल लावले. सीएनएन, फॉक्स वगैरे सगळीकडेच मुंबईमधल्या अतिरेक्यांच्या हल्ल्याची त्रोटक ब्रेकिंग न्यूज येत होती. पण लगेच पुन्हा अमेरिकेतल्या बातम्या दाखवत होते. त्या आम्हाला समजतही नव्हत्या आणि त्यात स्वारस्यही नव्हते. तरीही मुंबईतली परिस्थिती जाणून घेण्यासाठी त्या बातमीची वाट पहात आम्ही टीव्ही लावून तो पहात बसलो होतो. त्या मानाने बीबीसीवर मुंबईला जास्त वेळ दिला जात होता. आम्ही पहायला सुरुवात केली त्या वेळेपर्यंत बोरीबंदरवरला हल्ला करून आतंकवादी तिथून पसार झाले होते. तिथली काही दृष्ये दाखवत होते आणि ताजमहाल हॉटेल, ओबेरॉय हॉटेल व नरीमन हाउस या ठिकाणी ते त्यांच्या निर्घृण कारवाया करत होते. त्याबद्दल फारशी माहिती बाहेर आली नव्हती.

ऑफीसमधून घरी आल्यानंतर अजयने सांगितले की "अशा प्रसंगी टेलीफोन, ईमेल वगैरेंचे स्क्रीनिंग चाललेले असते आणि भारतातल्या लोकांशी अमेरिकेतून ज्या ज्या कोणी संपर्क साधला असेल ते सगळेच संशयास्पद समजले जातात आणि मग त्यांच्या मागे चौकशीचं झेंगट लागू शकतं." असे त्याला कोणीतरी सांगून सावध रहायचा सल्ला दिला होता. त्यामुळे या वेळी केवळ उत्सुकतेपोटी जास्त चौकशा करण्यापेक्षा सावधगिरी बाळगणे अधिक श्रेयस्कर होते. दक्षिण मुंबईत आमच्या ओळखीचे कोणी रहातच नाही आणि मुंबईच्या इतर भागात राहणा-या लोकांनी या बातम्या टीव्हीवरच पाहिल्या असतील. आम्हाला त्याचा आँखो देखा हाल कोणाकडून समजण्याची शक्यता नव्हतीच. त्यामुळे कोणाचा फोन आलाही नाही आणि आम्हीही कोणाला फोन करून काही विचारले नाही की सांगितले नाही.

मुंबईतल्या बड्या हॉटेलमध्ये अनेक अमेरिकन नागरिक अडकले असल्याचे जेंव्हा बाहेर यायला लागले तसतसा तिथल्या बातम्यांना देण्यात येणारा वेळ वाढत गेला आणि अमेरिकेतल्या दिवसाअखेरीस (म्हणजे भारतात दुसरा दिवस उजाडला असतांना) सीएनएनवर सतत रनिंग कॉमेंटरी सुरू झाली. आम्हीही त्यानंतर टीव्हीकडे टक लावून ती पहात बसलो. बोरीबंदरवरील हल्ल्यानंतर लगेचच पोलिस मुख्यालयातले तीन बडे अधिकारी त्या जागेच्या जवळपास मारले गेले होते. पण ही बातमी मात्र निदान चार पाच तास जाहीर केली गेली नव्हती. हळू हळू टप्प्याटप्प्याने ती सांगितली गेली तेंव्हा तिच्यावर विश्वास बसत नव्हता. ज्या पध्दतीने ती तिकडे सांगितली जात होती त्यावरून अनेक प्रश्न मनात उठत होते. अजूनही त्यांना समर्पक अशी उत्तरे सापडलेली नाहीत.

गेटवे ऑफ इंडियाजवळील मोकळ्या जागेत अनेक वृत्तवाहिन्यांनी तंबू ठोकून ऑब्झर्वेशन पोस्ट बनवलेली दिसत होती. कधी तिथून दिसणारे दृष्य तर कधी त्या वार्ताहरांना दाखवत होते. त्यात अनेक महिला सुध्दा दिसत होत्या. ताजमहाल हॉटेलच्या वेगवेगळ्या भागातून धुराचे प्रचंड लोट उठत होतेच, अनेक वेळा ज्वालांचे लोळसुध्दा स्पष्ट दिसत होते. कुठल्या क्षणी कोणती बातमी आतून बाहेर येईल याचा नेम नव्हता आणि प्रत्येक वार्ताहर ती जाणून घेण्याच्या प्रयत्नात दिसत होता. हे लोक शिफ्ट ड्यूटी करत आहेत की सतत तिथे बसून आहेत हेच कळत नव्हते. जवळजवळ ती संपूर्ण रात्र आम्ही बातम्या पहात जागून काढली. जगाच्या दुस-या टोकावर रहात असतांनासुद्धा मुंबईत चाललेले हे भयानक थरारनाट्य आम्हाला जागच्या जागी खिळवून ठेवत होते. यावरून प्रत्यक्ष ज्यांच्यासमोर ते उलगडत होते त्यांच्या मनाची काय अवस्था झाली असेल याची कल्पना करावी.

. . . . . . . . . (क्रमशः)

No comments: