Friday, October 15, 2010

***** कल्याणम् (भाग ३)

"एवढ्याशा पोरीनं खुनाचा प्रयत्न केलाय् म्हणता, शुध्दीवर आहात ना?" वरुण ओरडतात.
"वरुणराव, आधी तुम्ही भानावर या. तुमच्याच घरातली एक मुलगी आज मृत्यूच्या दारात उभी आहे याचं गांभीर्य ओळखा." शिंत्रे
"म्हणून काय तुम्ही या चिमुरडीवर आळ घेणार?"
"छे, छे, उलट या प्रकरणात तिचा नाहक बळी जाण्याची शक्यता मला दिसते आहे म्हणून मी तुम्हाला सावध करतो आहे."
"म्हणजे?"
"जाऊ दे, या घरातला कर्ता पुरुष म्हणून मी तुम्हाला काही साधे प्रश्न विचारतो त्यांची उत्तरे घरातल्या कोणीही दिली तरी चालेल. आता नसतील द्यायची तर तुम्हालाच ती पोलिस कचेरीत येऊन द्यावी लागतील."
"विचारा."
"तुम्ही स्वतः चिन्मयीला चालतांना बोलतांना शेवटचं केंव्हा पाहिलं आहे?"
"काल रात्री जेवायच्या वेळी."
"त्यानंतर तिनं काय केलं?"
"थोड्या वेळानंतर झोपायला गेली."
"कुठे? मला ती जागा दाखवा."
वरुण इन्स्पेक्टरांना मुलांच्या राहण्याच्या खोलीत घेऊन जातात.
"इथल्या कुठल्या बिछान्यावर ती झोपली होती?"
"अलीकडे ती माडीवरच्या गॅलरीत झोपते, तिकडे ती झोपायला गेली." प्रेमाने माहिती पुरवली.
"मला ती जागा दाखवा."
सगळे जिना चढू लागतात. वरच्या पायरीवर आल्यावर शिंत्रे थांबून म्हणतात, "इथून सगळी गॅलरी दिसते आहे. आज तिथे काय घडलं याच्या खुणा इथे दिसत आहेत. इथे उभे राहून वाटले तर त्या पाहून घ्या. पण आता या पायरीच्या पलीकडे कोणीही जायचे नाही. हवालदार, इथे दोरी बांधून सील लावा आणि पहारा करा. आमची टीम येईल, फोटो काढेल, बोटांचे ठसे घेईल, पंचनामा करून इथल्या महत्वाच्या वस्तू ताब्यात घेईल. आता खाली जाऊन बोलू या."
"तुमच्या घरात रोज सकाळी सगळे लोक चहा पितात ना?"
"हो"
"आज सकाळी चिन्मयीनं चहा घेतला?"
शांतता
"तिनं घेतला असं मी मघाशी ऐकलं. तिनं तो कुठे बसून घेतला? म्हणजे ती खाली आली होती की चहा तिच्याकडे पाठवला गेला होता?"
शांतता
"ठीक आहे. त्या गॅलरीत एक चहाचा कप आहे. त्याचं निरीक्षण केल्यावर त्यातला चहा केंव्हा बनवला होता ते आमचे तज्ज्ञ सांगतील आणि तो कप तिथे कोणी नेला होता हे त्या कपावरच्या बोटांच्या ठशावरून समजेल आम्हाला."
"इतक्या भानगडी कशाला? चिन्मयीसाठी प्रेमाच चहा घेऊन वर गेली होती हे सगळ्यांना माहीत आहे. कोणी सांगत का नाही आहे? बहिणीला चहा नेऊन देणं हा गुन्हा आहे का?"
"मुळीच नाही. बरं, इतक्या प्रेमानं तुमची प्रेमा चहाचा कप घेऊन गॅलरीत गेली ...... आणि तिथं जाऊन तिनं काय केलं?" करड्या आवाजात शिंत्रेनी विचारलं.
"मी काही केलं नाही.... आधीच.... आपणच... " भीतीने थरकाप झालेली प्रेमा तोंडातल्या तोंडात पुटपुटत होती.
"आधीच काय? आपणच काय?" शिंत्रे विचारतात, पण स्वातीचे वटारलेले डोळे पाहून प्रेमा चुप्प बसते.
"ठीक आहे. प्रेमानं काही केलं नाही. पण चिन्मयीनं काय केलं? प्रेमानं तिथं काय पाहिलं?"
"आई, मी सगळं स्वातीला सांगितलं आहे गं"
"अहो आधीच चिन्मयी आपणहूनच उठली होती. तिनं प्रेमाशी छान गप्पा मारल्या. आज मैत्रिणींबरोबर बाहेर जाऊन ती खूप मज्जा करणार होती म्हणून ती छान मूडमध्ये होती. हो ना ग प्रेमा?"
स्वातीकडे अविश्वासाने पहात गोंधळलेली प्रेमा पुटपुटली, "अं .. हो... नाही.. माहीत नाही."
"नंतर चिन्मयी मैत्रिणीकडे गेली होती ना? इथं गॅलरीत तर बाथरून, बेसिन वगैरे काही दिसत नाही आहे. त्यामुळे बाहेर जायला तयार होण्यासाठी चिन्मयी खाली आली असेलच. तिला हात पाय तोंड धुतांना, केस विंचरतांना, कपडे बदलतांना कुणी तरी पाहिलं असेलच ना. किती लोकांनी पाहिलं?"
पुन्हा शांतता.
"स्वातीताईंनी तरी नक्की पाहिलं असेल ना? चिन्मयी बाहेर गेली आहे असं मघाशी त्याच म्हणाल्या होत्या."
"छेः, मला कुठे एवढा वेळ आहे? मी तर माझ्या खोलीत होते आणि ऑफिसला जायची तयारी करत होते. प्रेमानं मला सांगितलं म्हणून मी तुम्हाला सांगितलं." स्वाती
"अं.. नाही... हो... माहीत नाही.. आई गं... " प्रेमाला आता रडू कोसळलं आहे
"या स्वातीताई किती सफाईनं या बोटावरची थुंकी त्या बोटावर करताहेत आणि प्रेमाला यात अडकवत आहेत पाहिलंत?" शिंत्रे उद्गारले. "या तर काहीही करून कदाचित निसटून जातील पण प्रेमाताईंचं कसं होईल? काही हरकत नाही. उद्या पोलिस स्टेशनमध्ये जबानी द्यायची वेळ येईल तेंव्हा त्यांच्यामागे असलेला हा रिमोट कंट्रोल नसेल आणि अशा नवनव्या थापा त्यांना सुचणार नाहीत. तेंव्हा आपसूक त्या खरं सांगतील आणि निर्दोष असल्या तर त्याचा त्यांना फायदाच मिळेल."
"म्हणजे?" वरुण
"चिन्मयीच्या अंथरुणावरचे हे रक्ताचे डाग आहेत ना?" शिंत्रे
"रक्त कसलं, साधं नेल पॉलिश असेल ते." प्रेमा
"ते काय आहे हे आमचे सायंटिस्ट सांगतील हं. ते कुणाचं रक्त आहे आणि त्या व्यक्तीच्या शरीरातून ते केंव्हा बाहेर निघालं ते सगळं समजेल. समजा ते रक्त कपातल्या चहापेक्षा जुनं निघालं, म्हणजेच प्रेमाताई चहा घेऊन गॅलरीत गेल्या त्याच्या आधीच चिन्मयीनं रक्त ओकलं होतं असं त्यातून सिध्द झालं तर त्यासाठी आम्ही प्रेमाताईंना जबाबदार धरणार नाही."
"नक्की तसंच झालं असणार. माझी खात्री आहे." वरुण
"पण मग अशा रक्तबंबाळ अवस्थेत चिन्मयीचा मूड चांगला कसा होता ते मात्र त्यांना सांगावं लागेल."
"आई गं... मी काय करू?" प्रेमा विव्हळते.
"सगळं ठीक होईल हं बाळ. तू शांत हो बरं." मनूकाकू प्रेमाला समजावतात. पण त्यासुध्दा भेदरलेल्या आहेत.
"तुला स्वतः थापा रचून मारायला जमणार नाही. त्यापेक्षा सगळं खरं खरं सांगून टाकलेलं बरं असं तुलाच वाटेल. तर वरुणराव, या जागी काय काय घडलं असणार याचा अंदाज मला आहे. त्यामुळे या गुन्ह्याचा तपास जवळ जवळ संपायला आला आहे. आता पुरावे गोळा करणं आणि जबान्या घेणं शिल्लक उरलं आहे. ते काम आम्ही आमच्या पध्दतीनं घेऊ."
"वरचा जिना तर तुम्ही सील केला आहेच. आता आणखी काय राहिलं आहे?"
"एक अगदी लहानसा पण महत्वाचा पुरावा बाहेर आहे. स्वातीताई, जरा तुमचा मोबाईल फोन मला पहायला देता का?"
-----------------------------------------------
(क्रमशः)

No comments: