Saturday, May 22, 2010

मराठी ब्लॉगर्सचा मेळावा (पूर्वार्ध)


९ मे रोजी दादरला झालेल्या या मेळाव्याला मी उपस्थित राहिलो होतो. कदाचित मी लगेच त्याचा सविस्तर वृत्तांत लिहिलाही असता. इतर अनेक ब्लॉगर मित्रांनी तो लिहिला आहेच. पण त्या मेळाव्याहून परततांना बसमध्ये एक अजब व्यक्ती भेटली आणि आधी त्याच्याबद्दल लिहावे असे वाटले. त्यानंतर मी आठवडाभर पुण्याला गेलो होतो. आता दोन आठवडे झाल्यानंतर या विषयावर लिहिणे हे वरातीमागून घोडे आणण्यासारखे असले तरी किरकोळ गोष्टी विस्मृतीच्या आड गेल्यानंतर जे शिल्लक राहते तेवढेच आपल्या दृष्टीने महत्वाचे असते हे ही तितकेच खरे आहे.

''एकाच पिसांचे पक्षी एकत्र येऊन त्यांचा थवा बनतो'' अशा अर्थाची एक इंग्रजी म्हण आहे. इतर तत्सम म्हणींप्रमाणेच हीसुध्दा बहुतेक वेळा मानवी जीवनाला उद्देशूनच उपयोगात आणली जाते. शाळेच्या गणवेषापासून ते सैनिक, टॅक्सीड्रायव्हर आणि बँडवाले वगैरेपर्यंत अनेक माणसे युनिफॉर्ममध्ये दिसतात आणि घोळक्यात वावरत असतात. आम्ही केसरीच्या टूरवर गेलो होतो तेंव्हा त्यांनी दिलेली कॅप घालून एकत्र फिरत होतो. ही बाह्य पिसे झाली. याखेरीज अनेक वेगवेगळ्या रंगांची अदृष्य पिसे धारण करून आपण त्या त्या पक्ष्यांच्या मेळाव्यामध्ये रमत असतो. गेल्या वर्षभराचाच आढावा घ्यायचा झाला तर अशा विविध प्रकारांच्या मेळाव्यांचे निरनिराळे अनुभव घेतले.

जवळच्या आप्तांच्याकडल्या किंवा घरच्याच कार्यात अंगावर पडेल त्या कामाचा आणि जबाबदारीचा वाटा उचलला, तर दूरच्या नातेवाइकांकडे जमलेल्या 'इतरेजनां'मध्ये सामील होऊन मिष्टान्नांचा मनसोक्त आस्वाद घेतला. कार्यालयीन किंवा व्यावसायिक जीवनात ज्यांच्या ओळखी झाल्या होत्या अशा लोकांकडल्या समारंभांमध्ये आजी माजी सहकारी आणि समव्यवसायी लोकांबरोबर बोलण्यात रमलो. या सगळ्या भेटीगांठींमध्ये एक समान सूत्र असते. जुन्या आणि मजेदार आठवणींना उजाळा देत पूर्वीचे संबंध पक्के करणे, सद्यस्थितीचा अंदाज घेणे आणि भविष्यकाळातल्या योजनांची स्वप्ने रंगवणे हे त्यात यायचेच, शिवाय दोघांनाही परिचित असलेल्या इतरांचा ठावठिकाणा अशा गप्पांमधून मिळतो. आधीपासून ओळख असलेल्या लोकांचे छंद माहीत असतात, त्यांनी कशात प्राविण्य मिळवले आहे हे ठाऊक असते, त्याबद्दल बोलता येते. कांहीच समानसूत्र नसले तरी आणि असले तरी हवापाणी, राजकारण, सिनेमा, नाटके, खेळ, महागाई, ट्रॅफिक जॅम वगैरे विषयांवर तर कोणाशीही बोलावे.

विजेची निर्मिती करण्याशी संबंधित अभियंत्यांची कार्यशाळा, श्रीमती कमलाताई काकोडकर यांनी लिहिलेल्या 'एक धागा सुताचा' या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ, अखिल भारतीय गांधर्व महामंडळाचा वर्धापन दिन आणि परांजप्यांनी केलेले सोळा सोमवारव्रताचे उद्यापन अशा चार टोकाच्या चार प्रातिनिधिक समारंभांना मी गेल्या वर्षभरात हजेरी लावली होती. एकाद दुसरा अपवाद वगळतां या चार ठिकाणी जमलेली माणसे वेगळी होती. असे असले आणि समारंभाचे मुख्य प्रयोजन आणि त्याच्या संबंधाने केले गेलेले कार्यक्रम सर्वथा भिन्न प्रकारचे असले तरी त्या मेळाव्यात जमलेल्या लोकांबरोबर केलेले व्यक्तीगत संभाषण मात्र वर दिलेल्या प्रकारांत मोडणारे होते.

आंतर्जालावरील विश्व अगदी समांतर म्हणण्याइतके विस्तारलेले नसले तरी त्याने आपल्या जीवनात एक महत्वपूर्ण जागा तयार केली आहे. जेंव्हा जेंव्हा वेळ आणि संधी मिळेल तेंव्हा त्या विश्वात जावेसे वाटते आणि जाणे होते. तिथे कांही माणसांची अधून मधून तर कांहीजणांची वारंवार गांठ पडते, त्यातल्या कांहींबरोबर पटते कांहींबरोबर पटत नाही. त्यामुळे कोणाशी संवाद तर कोणाशी वाद होतो. यातून एक प्रकारची आपुलकी निर्माण होते, त्या लोकांना प्रत्यक्ष भेटायची इच्छा होते. ही उत्कंठा मलाच वाटते असे नाही, इतरांनाही तशी वाटत असते असे दिसते. मागे एकदा अमेरिकेतल्या एका अप्रसिध्द गांवी कांही दिवस माझा मुक्काम होता. त्याचा सुगावा लागताच जवळच राहणा-या मीनलताईंनी माझ्याशी संपर्क साधला आणि प्रत्यक्ष येऊन अगत्याने मला आपल्या घरी घेऊन गेल्या. केवळ आंतर्जालावर झालेल्या ओळखीतून इतके अपूर्व आदरातिथ्य मला मिळाले. मनोगत या संकेतस्थळाच्या ठाणेकट्ट्याला जायची संधी मला मिळाली होती. त्या जागी जमलेल्या मनोगतींची गट्टी पहाण्यासारखी होती.

मराठी ब्लॉग लिहिणा-यांची संख्या आता हजारावर गेली असून वेगाने ती वाढते आहे. ते लोक जगाच्या पाठीवर असलेल्या अनेक देशांत आणि भारताच्या अनेक राज्यांत विखुरले असले तरी पुण्यामुंबईमध्ये त्यांची संख्या मोठी असणार हे साहजीक आहे. प्रत्येकजण स्वांतसुखाय लिहीत असला तरी आधी आपल्या ओळखीच्या लोकांनी आणि नंतर इतरांनी काय लिहिले आहे हे पाहण्याची उत्सुकता सर्वांना असते. मुळात ब्लॉग लिहिणे हाच अजून तरी अवांतर उद्योग असल्यामुळे ज्यांना लष्करच्या भाकरी भाजायला आवडतात असे लोकच या फंदात पडतात. त्याशिवाय सुरुवातीला फक्त वाचन करणारेही असतात. ते कधीकधी अभिप्राय देण्यापुरते लिहितात. अशा लेखक वाचकांना एकत्र येण्याची इच्छा असते, पण त्यासाठी कोणीतरी पुढाकार घेऊन प्रयत्न करणे आवश्यक असते. इंग्रजीमध्ये ब्लॉग लिहिणा-यांची संख्या अफाट असली तरी पुण्यामुंबईला त्यांचे असे संमेलन भरल्याचे माझ्या ऐकीवात तरी नाही. कांही उत्साही पुणेकर मंडळींनी प्रयत्न करून मराठी ब्लॉगर्सचे पहिले संमेलन पुण्यात भरवले.

. . . . . . . . . (क्रमशः)

No comments: