Tuesday, January 26, 2010

ब्लॉग माझा स्पर्धा


या ब्लॉगला वाचकांचा चांगला पाठिंबा मिळत गेला आहे याबद्दल मला समाधान आहेच. त्याशिवाय त्याची इतरत्र दखल घेतली गेली तर मग दुधात साखर पडेल असे वाटायचे. गेल्या वर्षी स्टार माझा या वाहिनीने ब्लॉग माझा ही स्पर्धा जाहीर केली आणि या स्पर्धेच्या निमित्याने अशी एक संधी आयती चालून आली. एका सन्माननीय तज्ज्ञ व्यक्तीकडून या ब्लॉगचे मूल्यमापन होऊन याची गणना उल्लेखनीय या सदरात केली गेल्याचे वृत्त मी दिलेच होते. अशा प्रकारची शाबासकीची थाप पाठीवर पडावी हे माझे सुदैवच आहे.

या स्पर्धेचा निकाल जाहीर झाल्यानंतर जवळ जवळ दोन महिने होत आले तरी पुढील हालचाल दिसली नाही. त्यामुळे मनात थोडी शंका उत्पन्न होऊ लागली होती. तेवढ्यात स्टार माझाच्या प्रसन्न जोशींची मेल आली आणि पाठोपाठ फोनही आला. रविवारी २४ तारखेला आमची प्रमाणपत्रे आम्हाला समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार असल्याची उत्साहवर्धक बातमी त्यांच्याकडून मिळाली. त्या ईमेलमध्ये जो कार्यक्रम दिला होता त्याप्रमाणे दुपारी साडेअकरा ते बारा वाजायच्या दरम्यान स्टूडिओमध्ये पोचायला हवे होते म्हणजे साडेनऊ दहाला घरातून निघायला हवे आणि कार्यक्रम संपल्यानंतर तीन साडेतीन वाजता अल्पोपहार मिळणार होता. दुपारच्या जेवणाचा डबा बरोबर नेला तरी तो खायला संधी मिळेल की नाही याबद्दल शंकाच होती. गोड फळ मिळवण्यासाठी थोडी कळ सोसावी लागते अशी मनाची समजूत घालून त्या कार्यक्रमाला जाण्याच्या तयारीला लागलो. स्टार माझाच्या स्टूडिओचा पत्ता दिलेला होता. गूगलवरून त्या जागेचा नकाशा काढून घेतला. ईमेलमध्ये दिलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे महालक्ष्मी रेल्वे स्टेशनला जाण्यापेक्षा वरळी नाक्याच्या बाजूने तेथे जाणे अधिक सोयीस्कर वाटल्याने तो मार्ग ठरवला आणि खरोखरच तो सोपा निघाला.

पुढे घडणार असलेल्या उपवासाचा विचार करून घरून निघतांना ब्रेकफास्टच्या ऐवजी ब-यापैकी ब्रंच घेतला. रविवारचा दिवस असल्यामुळे रस्त्यात वाहनांती गर्दी कमी होती. दिलेल्या वेळेच्या अगोदरच जाऊन स्टार टीव्हीच्या ऑफीसापर्यंत जाऊन पोचलो. बाहेरील गेटवरच्या दरवानाला आमच्या आगमनाची वर्दी मिळालेली नसावी. त्याने थोडी विचारपूस केल्यानंतर आंत प्रवेश करायची परवानगी दिली. स्वागतकक्षात नेहमी दिसते तशी स्वागतिका नव्हती, तिथे स्वागतक होता. त्याच्या पोषाखावरून तो सिक्यूरिटी ऑफीसर वाटत होता. त्याला मात्र आमच्या येण्याची कल्पना होती. त्याने समोरच्या कोचावर बसून घ्यायची सूचना केली. त्या कार्यक्रमासाठी येणा-यातला मी पहिलाच असावा अशी माझी कल्पना झाली. कदाचित माझ्याहून आधी आलेल्यांना त्याने आधीच ऑफीसच्या आंत पाठवून दिले असले आणि नंतर येणा-या लोकांना बाहेरच थांबवून ठेवण्याचा आदेश त्याला मिळाला असला तर ते योग्यच होते असे नंतर जाणवले.

माझ्यानंतर कांही मिनिटांनी श्री.प्रमोद देव आले. मनोगतच्या ठाणे कट्ट्यावर त्यांची ओळख झाली होती आणि मिसळपावच्या ई-हॉटेलात अधून मधून भेट होत असे. त्यांच्यासोबत बंगळूरहून आलेले छोटा डॉन आणि ठाण्याचे निखिल देशपांडेही होते. त्यानंतर इतर ब्लॉगकर्ते येत गेले आणि एकमेकांच्या ओळखी करून देत आणि घेत गेले. बाहेरच्या कक्षातल्या बसायच्या जागा भरत आल्यावर आम्हाला आंत पाठवण्यात आले. तिथले दृष्य इतर सर्वसामान्य ऑफीसांपेक्षा थोडे निराळे होते. आजकाल इतर अनेक ठिकाणी दिसते तसेच ते ऑपन ऑफीस असले तरी तिथल्या टेबलखुर्च्या एकाच दिशेने तोंड करून रांगेने मांडल्या नव्हत्या किंवा लहान लहान चौकोनात एकमेकांकडे पाठ करून कोणाला बसवलेले नव्हते. एका मोठ्या हॉलमध्ये पांच सहा जणांचा एक असे अनेक घोळके करून सारे जण बसले होते. अर्थातच प्रत्येकाच्या पुढ्यात एक संगणक होता आणि तो पहाता पहाता एकमेकांशी संवाद साधून एकमेकांच्या सहकार्याने ते सर्वजण काम करत होते. अशा प्रकारच्या व्यवस्थेत अत्यंत कडक शिस्त असायलाच हवी. तशी नसली तर तिचा मासळीबाजार होणे सहज शक्य आहे असा विचार मनात चमकून गेला. त्याच हॉलच्या एका कोप-यात थोड्या खुर्च्या गोळा करून आम्हाला बसवण्यात आले. आधी तर मला थोडे अवघडल्यासारखे वाटले. त्यातून सावरून आमचा मासळीबाजार रंगात येतांना पाहून आमच्यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली.

ज्या खोलीत आम्हाला पाठवण्यात आले तिचे आकारमान पाहता त्या खोलीचा उपयोग स्टोअररूम किंवा अडगळीची खोली याहून वेगळा होत असेल असे वाटत नव्हते. खोलीत मोकळी हवा येण्यासाठी खोलीत शिरायचा दरवाजा उघडा ठेवून आणि तो बंद होऊ नये म्हणून त्याला एका खुर्चीचा अडसर लावून त्यावर मी विराजमान झालो. सर्वांच्या मनोवृत्ती उल्हसित असल्यामुळे असल्या क्षुल्लक गोष्टींकडे कोणाचे लक्ष जात नव्हते. एकमेकांचे ब्लॉग सोडून इतर अनेक विषयांवर आमच्या मनमोकळ्या गप्पा चालल्या होत्या. आणखी कांही ब्लॉगकर आल्यानंतर त्या खोलीत जास्त खुर्च्या मांडायला जागा उरली नसल्यामुळे कांही लोकांना बाहेर स्वागतकक्षात ठेवलेल्या सोफ्यांवर बसायला सांगण्यात आले. आधी आम्ही सगळेच उठून बाहेर गेलो आणि तिथे सर्वांना पुरेशी जागा नसल्यामुळे अर्धे लोक परत आलो.

फक्त एक अपवाद सोडून इतर सारे पुरस्कार विजेते आले होते आणि त्यातले बहुतेकजण वेळेवर येऊन पोचले होते. थो़ड्या वेळाने प्रमुख पाहुणे येऊन पोचल्याची बातमी आली. उरलेल्या एका स्पर्धिकेची थोडा वेळ वाट पाहून झाल्यानंतर आम्हा सर्वांना त्या इमारतीच्या सातव्या मजल्यावर असलेल्या कँटीनमध्ये नेण्यात आले. त्या प्रशस्त हॉलमध्ये निदान साठसत्तर तरी लोकांनी एका वेळी जेवण घेण्याची सोय दिसत होती, पण जेवण खात असलेला किंवा ते वाढून देत असलेला एकही जण त्या जागी दिसला नाही. अत्यावश्यक कर्मचारी सोडून त्या इमारतीत काम करणा-या इतर सर्वांना बहुधा रविवारची सुटी असल्यामुळे त्या दिवशी कँटीन बंद असावे.

प्रमुख पाहुणे श्री. अच्युत गोडबोले आल्यावर आम्ही सारेजण आपापल्या खुर्च्या सरकवून त्यांच्या भोंवताली गोळा झालो. प्रसन्न जोशीने त्यांची औपचारिक ओळख करून दिली आणि तो पुढच्या कार्यक्रमाचे संयोजन करण्यासाठी चालला गेला. अच्युतरावांना सर्वजण ओळखत होतेच. फक्त त्यांचे नांव सांगणे पुरेसे होते. खरे तर त्यांचा फोटोसुध्दा अनेक वेळा वर्तमानपत्रात पाहिला असल्यामुळे चेहरासुध्दा ओळखीचा होताच. त्यांनी लिहिलेली पुस्तके कांही लोकांनी वाचली होती. एकाने तर त्या पुस्तकांची पारायणे केली असल्याचे सांगितले. यापूर्वी एका कार्यक्रमात मी त्यांना प्रत्यक्ष जवळून पाहिलेले होते. समोरासमोर बसून वार्तालाप करण्याची मात्र ही पहिलीच वेळ होती.

त्यांनी या ब्लॉगस्पर्धेत परीक्षण केले होते. हे परीक्षण कोणत्या निकषांवर केले गेले हे त्यांनी आधी थोडक्यात सांगितले. पिंडे पिंडे रुचिर्भिन्ना या संस्कृत सुभाषितानुसार प्रत्येक माणसाच्या आवडीनिवडी आणि त्याची मते भिन्न असणारच. परीक्षकाच्या वैयक्तिक आवडी किंवा मते यांच्याशी त्या गोष्टी जुळतील अशी अपेक्षाच नव्हती. त्या कशा प्रकारच्या आहेत यावर भर न देता प्रत्येकाच्या ब्लॉगवर त्या कशा प्रकारे मांडल्या गेल्या आहेत हे पाहिले गेले. ब्लॉगचा विषय, आशय, मांडणी, सजावट, त्याला आलेले प्रतिसाद वगैरे पाहून त्याला कांही गुण दिले गेले आणि त्यांची बेरीज करून सर्वांगसुंदर अशा ब्लॉग्जची निवड करण्यात आली असे त्यांनी सांगितले.

. . . . . . . . . .. (उत्तरार्ध पुढील भागात)

1 comment:

मी अत्त्यानंद said...

वा! आनंदराव! खूपच सविस्तर लिहिताय.
वाचायला मजा येतेय.(मीही वृत्तांत लिहिलाय पण खूपच त्रोटक आहे तो.)
मी आपल्याला भेटलो तेव्हा माझ्याबरोबर श्री.देवदत्त आणि त्यांच्या सौभाग्यवती होत्या. छोटा डॉन आणि निखिल देशपांडे मागाहून आले.