Tuesday, October 13, 2009

अमेरिकेची लघुसहल - दुसरा दिवस -३ नायगारा -३


नायगाराच्या धबधब्यावरून पडणा-या पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे त्या जागी एक लांब, रुंद आणि खोल अशी दंतुर आकाराची मोठी घळ तयार झाली आहे. या घळीच्या कांठाकांठाने वेगवेगळ्या ठिकाणांवरून तिथल्या तीन धबधब्यांचे दर्शन घेण्यासाठी उत्कृष्ट व्यवस्था केली आहे. त्यातील प्रत्येक पॉइंटला जाण्यासाठी पक्का रस्ता, त्या जागी निरीक्षण करीत उभे राहण्यासाठी विस्तीर्ण जागा, सुरक्षेसाठी मजबूत असे कठडे अशा सगळ्या प्रकारच्या सोयी आहेत. त्याखेरीज घळीच्या तळाशी जाऊन समोरून खाली पडणारे पाण्याचे प्रवाह पाहण्यासाठी अनेक सोयी आहेत. त्यातल्या दोन व्यवस्था पाहण्याचा समावेश आमच्या सहलीच्या कार्यक्रमात होता.


मेड ऑफ दि मिस्ट या नांवाची वाहतूक कंपनी मोटर लाँचमधून या नदीतून फिरवून आणते. तीन्ही जागी धबधब्यातून पडणारे पाणी खालच्या एकाच मोठ्या डोहात एकमेकांमध्ये मिसळते आमि त्याचा खळाळता प्रवाह नदीच्या पात्रातून वहात वहात पुढे ओंटारिओ सरोवराकडे जातो. धबधब्याच्या पातळीवरून खाली उतरण्यासाठी लिफ्टची व्यवस्था केलेली आहे. कॉलेजात असतांना मी गिरसप्पाचा धबधबा पहायला गेलो होतो. त्या काळी खाली उतरण्यासाठी मातीच्या उतारावर पाय-या होत्या. त्यातून घसरत आणि पडत पडत आम्ही मित्रमंडळी खाली उतरून गेलो होतो आणि रांगत रांगत वर चढून आलो होतो. त्या वयात ते शक्य होते आणि त्यात खूप मजाही वाटली होती, पण आता त्याचा विचारसुध्दा केला नसता. नायगाराला मात्र अपंग माणूस सुध्दा व्हीलचेअरवर बसून खालपर्यंत जाऊ शकतो. त्या खोल घळीच्या एका किना-यावर एक उंचच उंच पोकळ खांब उभा करून त्यावर मोठा प्लॅटफॉर्म केला आहे. वरील बाजूच्या इमारतीतून तिथपर्यंत जाण्यासाठी बांधलेल्या पुलावरून तिथपर्यंत गेलो आणि लिफ्टने खाली उतरलो. याचे इंजिनिअरिंगसुध्दा थक्क करणारे आहे.


खाली मोटर लॉँचचा धक्का आहे. त्यात जाण्यापूर्वी सर्व पर्यटकांना एक निळ्या रंगाचा प्लॅस्टिकचा रेनकोट देतात. तो अंगावर चढवणे आवश्यक आहे. खळाळत्या पाण्यातून ती बोट हिंडकळत पुढे पुढे जाते आणि एकेका धबधब्याचे दृष्य अगदी जवळून पहायला मिळते. इतक्या उंचीवरून खाली पडतांनाच त्या पाण्याचा शॉवर झालेला असतो. त्याची धार शिल्लक रहात नाही. शिवाय खाली पडलेल्या पाण्याचे असंख्य तुषार पुन्हा कारंज्यासारखे उंच उडत असतात. ते अंगावर घेत घेत फिरायला अपूर्व मजा येते. जोराचा थंडगार वारा सुटलेला असल्यामुळे अंगावर पुरेसे गरम कपडे असणे आवश्यक होते. त्या डोहात अर्धा पाऊण तास चक्कर मारून एक वेगळा अनुभव गांठीला बांधून परत आलो.


त्यानंतर केव्ह ऑफ दि विंड नांवाच्या जागी गेलो. धबधब्याच्या खाली डोंगराच्या कड्याच्या कांठाकांठाने चालत जायची एक वळणावळणाची वाट बांधली आहे. या ठिकाणी अंगावर पिवळा रेनकोट आणि पायात प्लॅस्टिकचे सँडल्स घालून त्या निसरड्या वाटेवरून फिरून यायचे. काही कांही ठिकाणी अनेक पाय-या चढाव्या आणि उतराव्या लागतात. या पदयात्रेत सगळीकडेच जवळ जवळ मुसळधार पाऊस पडत असल्याचा भास होतो. थेट धबधब्याच्या खाली उभे राहून वरून बदाबदा पडणारे पाणी त्याचा प्रचंड आवाज ऐकत पहाणे हा एक अभूतपूर्व अनुभव आहे. त्या जागेच्या नांवावरून तिथे एकादे विंड टनेल असेल असे मला आधी वाटले होते. तसा गार वारा वहात होता, पण भुयार मात्र नव्हते. पैसे खर्च करून आणि शरीराला कष्ट देऊन असा थरारक अनुभव घ्यावा असे माणसाला कां वाटते याचे मात्र कोडे पडते.


या परिसरात एक पार्क आहे. त्याच्या प्रवेशद्वारापाशी निकोला टेसला या संशोधकाचा पुतळा उभा केला आहे. नायगारा धबधब्यापासून वीजनिर्मिती करणारी यंत्रसामुग्री बसवून त्याचा उपयोग करण्याचे काम त्याने केले. या खेरीज अनेक चित्तवेधक जागा या ठिकाणी आहेत. त्या सगळ्या आम्ही पाहू शकत नव्हतो. पुरेसा वेळ आणि पैसे खर्च करण्याची तयारी असेल तर त्या ठिकाणी दोन तीन दिवस मुक्काम करूनच त्या पाहता येतील. पण महत्वाच्या आणि प्रसिध्द गोष्टी पाहून त्या सहलीचे सार्थक झाल्याचे समाधान बरोबर घेऊन आम्ही पुढच्या मार्गाला लागलो.

No comments: