Saturday, October 03, 2009

अमेरिकेची लघुसहल - पहिला दिवस -२ - सहस्रद्वीपे


आमच्या बसमध्ये सर्वात जास्त चिनी प्रवासी होते आणि त्यानंतर भरतखंडातून आलेले दिसत होते. आमच्या चिनी वाटाड्याने हंसतमुखाने सर्वांचे मनःपूर्वक स्वागत केले आणि प्रवासाची माहिती दिली. आम्ही ठरलेल्या मार्गावरूनच पण उलट दिशेने प्रवास करून वर्तुळ पूर्ण करणार आहोत आणि एक बिंदूसुध्दा वगळला जाणार नाही असे आश्वासन देऊन या तीन दिवसात आपण कायकाय पहाणार आहोत याची लांबलचक यादी वाचून दाखवली. आम्ही त्या सहलीची पुस्तिकाच पाहिली नसल्यामुळे नायगरा आणि वॉशिंग्टन या दोन शब्दांपलीकडे त्यातून आम्हाला फारसा बोध झाला नाही. पण खूप कांही पहायला मिळणार आहे हे ऐकून सुखावलो.
त्यानंतर त्याने या प्रवासाचे कांही नियम सांगून कांही आज्ञावजा सूचना केल्या. संपूर्ण प्रवासात प्रत्येक प्रवाशाने त्याला दिलेल्या जागेवरच बसले पाहिजे. बसचा नंबर लक्षात ठेवावा किंवा लिहून ठेवावा. कोठल्याही ठिकाणी बसमधून उतरल्यानंतर सर्व पर्यटकांनी सतत मार्गदर्शकासोबतच रहाणे उत्तम, पण घोळक्यातून कोणी वेगळा झालाच तर त्याने दिलेल्या वेळेवर बसपाशी येऊन थांबावे. गाईडचा मोबाईल नंबर आपल्याकडील मोबाईलवर सांठवून ठेवावा, पण कृपया "आमच्यासाठी बस थांबवून ठेवा." असे सांगण्यासाठी त्याचा उपयोग करू नये, पुढच्या ठिकाणाची चौकशी करून "आम्ही त्या जागी स्वखर्चाने येऊन भेटू." असे सांगण्यासाठी करावा. तीन दिवसांचा बसचा प्रवास आणि दोन रात्री झोपण्याची सोय एवढ्याचाच समावेश या तिकीटात आहे. त्याखेरीज अन्य सर्व खर्च ज्याने त्याने करायचे आहेत. पोटपूजेसाठी अधून मधून बस थांबवली जाईल, तेंव्हा जवळ असलेल्या कोणत्याही खाद्यगृहात जाऊन ज्याला पाहिजे ते आणि हवे तेवढे हादडून घ्यावे किंवा बरोबर नेण्यासाठी विकत घेऊन ठेवावे, पण वेळेवर बसपर्यंत पोचायचे आहे याचे भान ठेवावे. प्रत्येक प्रेक्षणीय ठिकाण पाहण्यासाठी तिकीट काढावे लागते. त्यासाठी एकंदर बत्तीस डॉलर गाईडकडे सुरुवातीलाच द्यावेत. गाईड आणि ड्रायव्हर यांना दर डोई दररोज सहा डॉलर टिप द्यायची आहे, ती मात्र टूरच्या शेवटी एकत्रच गोळा केली जाईल. अशा प्रकारचे त्याचे निवेदन बराच वेळ चालले होते. प्रत्येक वाक्य एकदा इंग्लिशमध्ये बोलून त्याचे मँडारिनमध्ये भाषांतर करू तो सांगत होता. यँकीजच्या मानाने त्याचे शब्दोच्चार स्पष्ट होते आणि बंगाली लोकांशी बोलण्याची संवय असणा-या लोकांना ते समजायला अडचण नव्हती. इंग्लिशमधील वाक्यच मँडारिनमध्ये सांगायला त्याला दुप्पट वेळ लागतो आहे असे वाटून तो कदाचित त्यांना जास्त सविस्तर सांगत असावा अशी शंका येत होती.
त्याचे निवेदन संपल्यानंतर आमची बस सुरू होऊन मार्गाला लागली तोंपर्यंत सव्वानऊ वाजले होते आणि सकाळच्या न्याहरीची वेळ झाली असल्याचे संदेश जठराकडून यायला लागले होते. प्रवाशांच्या खाण्यापिण्याची जबाबदारी टूरिस्ट कंपनीकडे नव्हतीच. "सर्व पर्यटक ब्रेकफास्ट करूनच आले असावेत" असे त्यांनी गृहीत धरले होते की "हे चिनी लोक नाश्ताच करत नाहीत." यावर चर्चा करीत आम्ही आपले फराळाचे डबे उघडून जठराग्नीला आहुती दिल्या. दोन तीन तासानंतर आमची बस एका गॅस स्टेशनवर म्हणजे अमेरिकेतल्या पेट्रोल पंपावर थांबली. बस आणि प्रवासी दोघांनीही अन्नपाणी भरून घेतले.
न्यूयॉर्क शहर सोडून बाहेर पडतांना आमची गाडी अतीशय रुंद अशा महामार्गावरून धावत होती. तोंपर्यंत आम्हाला अमेरिकेत येऊन चार पांच दिवस झाले होते आणि आम्ही रोज फिरतच होतो. त्यामुळे तिकडले महामार्ग, त्यावरून सुसाट वेगाने धांवणारी वाहने, त्यांचा एकत्रित घोंघावत येणारा आवाज, मैल दीड मैल लांब रस्त्यावरील असंख्य वाहने पाहून एक अजस्त्र प्राणी सरपटत जात असल्याचा होणारा भास या सर्व गोष्टींची संवय व्हायला लागली होती. जसजसे आम्ही शहरापासून दूर जात गेलो, रस्त्यांची रुंदी, त्यांवरील वाहनांची गर्दी, बाजूला दिसणा-या इमारतींची उंची आणि संख्या वगैरे सारे कमी कमी होत गेले. थोड्या वेळाने नागरी भाग संपून कंट्री साइड (ग्रामीण भाग) सुरू झाला आणि तोसुध्दा मागे पडून डोंगराळ भाग सुरू झाला. ही सारी न्यूयॉर्क राज्याचीच विविध रूपे असल्याचे समजले. त्या वेळी फॉल सीजन चालला असल्यामुळे सारे डोंगर फक्त दुरून साजरेच दिसत नव्हते, तर रंगाच्या बरसातीने चांगले सजले होते. शत्रूपासून आपला जीव वाचवण्यासाठी लहानसा सरडा रंग बदलतो आणि झाडीमध्ये किंवा झाडांच्या खोडात दिसेनासा होतो. शीत कटिबंधातले हे ताडमाड उंच असंख्य वृक्ष मात्र थंडीपासून आपला जीव वाचवण्यासाठी आपले रंग बदलतात आणि जास्तच उठून दिसतात.
संध्याकाळच्या सुमाराला आम्ही थाउजंड आयलंडच्या भागात जाऊन पोचलो. अमेरिकेची संयुक्त संस्थाने (यूएसए) आणि कॅनडा या दोन देशांच्या दरम्यान पांच मोठमोठी सरोवरे आहेत. त्यातल्या ओंटारिओ सरोवरात एका उथळ भागाच्या तळावर हजारोंनी उंचवटे आहेत. त्यातले जे बाराही महिने पाण्याच्या वर राहतात आणि ज्यावर निदान दोन वृक्ष बारा महिने असतात अशा बेटांची संख्याच अठाराशेच्या वर आहे. त्याशिवाय पाण्याची पातळी उंड जाताच अदृष्य होणारी किंवा वृक्षहीन अशी कितीतरी बेटे असतील. यातील बहुतेक बेटे त्यांवर जेमतेम एकादी इमारत, थोडीशी बाग वगैरे करण्याइतकी लहान लहान आहेत. शंभर सव्वाशे वर्षांपूर्वी लोकांचे लक्ष या बेटांकडे गेले. अनेक श्रीमंत लोकांनी यातली बेटे विकत घेऊन त्यावर बंगले बांधले आणि उन्हाळ्यात ते इथे येऊन मौजमजा करू लागले. थंडीच्या दिवसात हे सरोवरच गोठून जात असल्यामुळे या भागातली रहदारी कमी होऊन जाते. उन्हाळ्याच्या दिवसात लहान मोठ्या मोटरबोटींनी कुल्याही बेटावर जाता येते.
अंकल सॅम बोट टूर कंपनीच्या मोटरबोटीत बसून आजूबाजूची बेटे पहात आम्ही तासभर या सरोवरात फेरफटका मारला. प्रत्येक बेटावरील इमारत हे वाय्तुशिल्पकलेचा नमूना वाटावा इतकी आगळी वेगळी वाटते. कोणी त्याला किल्ल्याचा आकार दिला आहे तर कोणी भूतबंगला वाटावा असा आकार दिला आहे. सरोवरातून जाता जाता दृष्टीपथात येणा-या द्वीपांबद्दल एक मार्गदर्शक माहिती सांगत होता. कोणते बेट कोणत्या अब्जाधीश सरदाराने कधी विकत घेतले किंवा सध्या कोणत्या नेत्याच्या किंवा अभिनेत्याच्या ताब्यात आहे याबद्दल मनोरंजक माहिती दिली जात होतीच, कांही बेटांसंबंधी करुण कथासुध्दा सांगितल्या जात होत्या. त्यातली कोणतीच नांवे ओळखीची नसल्यामुळे आम्हाला त्यात फारसा रस नव्हता आणि एकदा ऐकून ती नांवे लक्षात राहणे तर केवळ अशक्य असते. यांमधील अनेक बेटांवर आता हॉटेले उघडली असून जगभरातले नवश्रीमंत लोक उन्हाळ्यात तिथे सुटी मजेत घालवण्यासाठी येतात. हेसुध्दा आमच्या कल्पनेच्या पलीकडचे होते.
तासभर या आधीच निसर्गरम्य तसेच मानवाने जास्तच आकर्षक केलेल्या सहस्रद्वीपांची एक झलक दुरूनच पाहून आम्ही आपल्या बसमध्या परत आलो.

No comments: