Sunday, October 11, 2009

अमेरिकेची लघुसहल - दुसरा दिवस -2


नायगारावरील चित्रफीत पाहून झाल्यानंतर आम्ही प्रत्यक्ष धबधबा पहायला निघालो. आपल्याला माहीत असलेल्या बहुतेक सर्व नद्या पर्वतावर उगम पावतात आणि समुद्राला किंवा दुसर्‍या मोठ्या नदीला जाऊन मिळतात. पण नायगरा नदी ही या नियमाला अपवाद आहे. कॅनडाच्या सीमेवर असलेल्या पाच महासरोवरांपैकी ईरी या सरोवरातून नायगारा नदी निघते आणि ओंटारिओ या दुसर्‍या सरोवराला जाऊन मिळते. थोडक्यात ईरी सरोवराचा ओव्हरफ्लो या नदीतून ओंटारिओ सरोवरात होतो. या नदीची लांबी जेमतेम छप्पन मैल आहे. आणि तिला सलग उतार नसून ती एका कड्यावरून धाडकन उडी मारून एकदम खालच्या पातळीवर येते. यातूनच हा धबधबा तयार झाला आहे.


धबधब्याच्या वरच्या अंगाच्या प्रदेशात कांही बेटे आहेत. त्यातल्या गोट आयलंड नावाच्या बेटाने नदीचा प्रवाह दुभंगून त्याचा एक भाग कॅनडाच्या प्रदेशातून आणि दुसरा यूएसएमधून वहात जातो आणि वेगवेगळ्या जागी खाली कोसळतो. यूएसएमधील नदीच्या प्रवाहाचे पुन्हा दोन वेगळे भाग होतात आणि एकमेकांच्या जवळच पण वेगळ्या कड्यांवरून खाली येतात. अशा तर्‍हेने एका परिसरातच तीन स्वतंत्र धबधबे आहेत.

सर्वात लहानसा ब्राइडल वील हा सुमारे १७ मीटर रुंद आणि २५ मीटर उंच आहे, दुसरा अमेरिकन फॉल तीनशे मीटर रुंद आणि असाच २५-३० मीटर उंच आहे आणि तिसरा म्हणजेच सर्वात मोठा हॉर्सशू फॉल मात्र ८०० मीटर रुंद आणि ५० मीटरावर उंच आहे. या भागातली जमीन अतीशय उंचसखल असल्यामुळे हे आंकडे वेगवेगळ्या बिंदूंपाशी वेगळे असणार आणि पाण्याचे प्रमाण कमी जास्त होत असल्याने या आंकड्यांत सारखा बदलही होत असतो. ही मोजमापे फक्त अंदाज येण्यापुरती आहेत. या ठिकाणी खूप मोठे जलविद्युत केंद्र आहे आणि पाण्याचा बराचसा भाग तिकडे वळवला जातो. विशेषतः रात्रीच्या वेळी कधी कधी धबधब्यावरून पडणारा मुख्य प्रवाह अर्ध्यावरसुध्दा आणला जातो. तरीदेखील तो दर सेकंदाला दीड हजार घनमीटर इतका प्रचंड असतो. हिवाळ्यात सरोवरातले पाणी गोठून गेल्यामुळे त्याचा प्रवाह कमी होतो आणि ुन्हाळ्यात ते वितळल्यामुळे नायगरा नदीला पूर येतो.

पावसाळ्याच्या दिवसात पुणे मुंबई प्रवासात खंड्याळ्याच्या घाटातून जात असतांना आपल्याला अनेक जलौघ कडेकपारावरून खाली झेपावतांना दिसतात. तशाच प्रकारचा पण मोठ्या आकाराचा ब्राइडल वील हा धबधबा आहे. त्याच्या पाण्याच्या झिरझिरीत पापुद्र्यातून अनेक झिरमिळ्या लोंबतांना पाहून कोणा कवीमनाच्या संशोधकाला नववधूचा चेहरा आठवला. कपाळाला फुलांच्या मुंडावळ्या किंवा सेहरा बांधलेली भारतीय नववधू किंवा अत्यंत तलम कापडाचा बुरखा (ब्राइडल वील) पांघरलेली ख्रिश्चन ब्राइड यांचा चेहरा म्हंटले तर झाकलेला असतो पण त्या पडद्यातून दिसतही असतो, तसएच या धबधब्याचे रूप आहे, म्हणून त्याला ब्राइडल वील फॉल असे नाव दिले आहे. हा धबधबा पाहण्यासाठी एक जागा ठेवली आहे, त्याठिकाणाहून तो व्यवस्थितपणे पाहता येतो.ब्राइडल वील पाहणे आणि फोटो काढणे वगैरे झाल्यानंतर आम्ही अमेरिकन फॉल्स पहायला गेलो. हा धबधबा खूप मोठा आहे. ज्या डोंगरावरून नायगारा नदी खाली उडी मारते त्याला अनेक कंगोरे आहेत. त्यामुळे प्रत्येक धबधब्याच्या समोरच्या बाजूला दुसर्‍या कंगोर्‍यावर उभे राहून त्याचे छान दर्शन घेता येते. अमेरिकन धबधब्याचा आकार विशाल आहे, तसेच खाली पडत असलेले पाणी खाली पडतांना खालच्या खडकावर आपटून पुन्हा वर उसळी घेते ल्यामुळे उडणारे तुषार खूप उंचवर उडत असतात. ते एकमेकात मिसळून धुक्याचा एक प्रचंड पडदाच उभा असल्यासारखे वाटते. आम्ही सकाळच्या वेळी गेलो असल्यामुळे सूर्याचे किरण या पडद्यावर पडून त्यातून अत्यंत सुरेख असे इंद्रधनुष्य तयार होत होते. खाली पाण्याला टेकलेले आणि वर आभाळापर्यंत पोचलेले ते इंद्रधनुष्य आपल्याबरोबर पुढे पुढे जात असतांना पाहून खूप गंमत वाटत् होती.
अमेरिकन फॉल मनसोक्त पाहून झाल्यावर आम्ही हॉर्सशू फॉल पहायला गेलो. कॅनेडियन बाजूला असलेला हा खरा नायगरा धबधबा! घोड्याच्या नालेसारखा वक्राकार असलेल्या या भव्य धबधब्याचे दर्शन खरोखरच स्तिमित करणारे आहे. आम्ही यूएसएच्या बाजूला असल्यामुळे आम्हाला या वेळी तो बाजूनेच पहायला मिळाला, पण पूर्वी मी हा धबधबा कॅनडामधून पाहिला होता तेंव्हा त्याचे अगदी समोरून दर्शन झाले होते. त्यावेळी त्या धबधब्याला नजरेसमोर ठेऊन आम्ही निदान तासभर तरी समोरच्या रुंद रस्त्यावर पायी येरझारा घालत होतो. त्याशिवाय कॅनडाच्या भागात असलेल्या उंच मनोर्‍याच्या सर्वात टोकाच्या मजल्यावर असलेल्या फिरत्या रेस्टॉरेंटमध्ये बसून धबधब्याकडे पहात पहात रात्रीचे भोजन घेतले होते. या वेळी पलीकडच्या तीरावर असलेला हा मनोरा सहप्रवाशांना दाखवून मी तिथे गेलो होतो असे सांगून थोडा भाव खाऊन घेतला.

No comments: