Sunday, March 22, 2009

शास्त्र व विज्ञान यांतील फरक

नियतकालिकांमध्ये येणार्‍या कांही लेखांमध्ये व माध्यमांद्वारे होणार्‍या चर्चेत 'शास्त्र' व 'विज्ञान' या शब्दांचा मुक्तपणे उपयोग केला जातो असे दिसते. त्यातील वैचारिक गोंधळ लक्षात घेऊन या दोन संकल्पनांवर माझे विचार मांडत आहे. हे दोन्ही शब्द प्राचीन काळापासून उपयोगात आलेले आहेत असे दिसते, पण संदर्भानुसार त्यांचे अर्थ बदलत आलेले आहेत. अनेक धार्मिक विधि आपण 'वेदशास्त्रपुराणोक्त' रीतीने करतो. त्यात 'शास्त्र' याचा अर्थ कांही नियम वा रीतीभाती असा होतो. न्याय, व्याकरण, संगीत, नाट्य अशा अनेक विषयांमधील परंपरागत नियमबध्दता शास्त्र या संकल्पनेत येते. "आपणा आपण जाणिजे तया नाम ज्ञान" असे म्हंटलेले आहे. गीतेमधील 'ज्ञान, विज्ञान' यांत स्वतःबद्दल किंवा आत्मापरमात्म्याची माहिती म्हणजे 'ज्ञान' आणि (बाह्य जगाची) विशिष्ट माहिती म्हणजे 'विज्ञान' असे ढोबळमानाने म्हणता येईल. 'सायन्स' ही संकल्पना पूर्वीच्या काळांत जगात कुठेही अस्तित्वात नव्हती. युरोपात देखील अगदी अलीकडेपर्यंत तो तत्वज्ञानाचा भाग होता. सतराव्या अठराव्या शतकात युरोपमध्ये सायन्सला वेगळे करण्यात आले व विसाव्या शतकात मराठीमध्ये 'विज्ञान' हा 'सायन्स' या शब्दाचा पर्याय झाला. परंतु 'शास्त्र' या शब्दाचा सुध्दा 'सायन्स'ला प्रतिशब्द म्हणून सर्रास उपयोग होतच राहिला.

व्याकरण शास्त्र, संगीत शास्त्र यासारख्या 'शास्त्रां'मध्ये माणसांनी केलेल्या अनेक नियमांचा समावेश होतो, ते नियम कालानुसार बदलत राहतात व वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे असू शकतात. विज्ञान किंवा सायन्समध्ये फक्त निसर्गनिर्मित किंवा (आस्तिक लोकांच्या विश्वासानुसार) परमेश्वराने केलेले नियमच येतात, तसेच ते सर्वांना समान प्रकारे लागू होतात हा एक या दोन्ही संकल्पनांमध्ये महत्वाचा फरक आहे. माणूस विज्ञानाचे नियम फक्त समजून घेऊ शकतो, तो त्यात स्वतःचे नियम करू शकत नाही किंवा निसर्गाचे नियम बदलू शकत नाही. विज्ञानाचे नियम स्थळकाळातीत असतात. कोणीही ते सप्रयोग सिद्ध करू शकतो. सायंटिस्ट्स किंवा वैज्ञानिकांची इतर शास्त्रीपंडितांबरोबर तुलना होऊ शकत नाही, कारण निसर्गाच्या व्यवहाराचा सखोल अभ्यास करून त्यांत वैज्ञानिकांना जे सत्य दिसेल, जाणवेल, जे आकलन होईल तेवढेच ते इतरांना सांगतात तर इतर शास्त्री पंडित आपली स्वतःची मते, कल्पना, विचार वगैरे
मुक्तपणे मांडतात, त्यांच्या क्षेत्रांत ते स्वतःचे नवे नियम बनवू शकतात.

उदाहरणार्थ हिन्दू असो वा ख्रिश्चन असो दोघांनाही पदार्थविज्ञानाच्या नियमाप्रमाणे ऊष्णतेचे चटके बसतात किंवा त्यांनी उंचावरून उडी मारली तर ते दोघेही गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार खाली येतील. हे परमेश्वराने बनवलेले 'विज्ञान' आहे. पण देवळामध्ये जोडे काढून व डोक्यावर टोपी किंवा पागोटे घालून जाणे आणि चर्चमध्ये शिरतांना डोक्यावरील हॅट काढून पण पायांतले बूट न काढता आत जाणे ही माणसांनी सांगितलेली शास्त्रे आहेत. स्थानिक परिस्थितीनुसार ती धर्मशास्त्रे वेगवेळ्या प्रकारे विकसित झालेली आहेत.

मराठी भाषेत 'शास्त्र' व 'विज्ञान' हे दोन्ही शब्द एकाच अर्थाने वापरून फार मोठा गोंधळ निर्माण करून ठेवला गेलेला आहे. सोवळे ओवळे, उपास तापास वगैरे अनेक परंपरागत गोष्टी हिंदू धर्म'शास्त्रात' व्यवस्थित बसतात. मनातून एखादी गोष्ट करायची नसेल तेंव्हा सुध्दा इतरांसाठी आपण 'शास्त्रा'पुरती ती थोडीशी करतो. इथे 'शास्त्रा'चा 'विज्ञाना'शी कसलाही संबंध येत नाही. 'विज्ञान' या विषयामध्ये तर्कशुद्ध विचार करणे अत्यंत महत्वाचे असते. ध्वनीस्पंदने, विद्युल्लहरी अशा विज्ञानातल्या संकल्पना भोंगळपणे वापरण्याला तेथे वाव नाही. त्या वापरतांना त्यांच्या ऊर्जेचे मोजमाप, कंपनसंख्या, शरीरातील विशिष्ट भागांवर त्याचा प्रत्यक्ष होणारा निश्चित परिणाम, त्या परिणामाचे मोजमाप वगैरे समजून घेणे आवश्यक असते. "दरवाजावर आंब्याच्या पानांचे तोरण बांधले तर 'पॉझिटिव्ह एनर्जी'चा घरात संचार होतो" असले 'शास्त्र' 'विज्ञाना'त बसत नाही. कुठल्या तत्वाचा कोणी शोध लावला याहीपेक्षा तो कसा सिद्ध केला गेला हे 'विज्ञाना'त महत्वाचे असते. आधीच एक निष्कर्ष गृहीत धरून तो सिध्द करण्यासाठी त्याअनुषंगाने मुद्दे मांडणे हे 'नीतिशास्त्र', 'पाकशास्त्र', 'विधिसंस्था' वगैरेमध्ये ग्राह्य असेल पण ते 'विज्ञाना'ला धरून नाही. तिथे आधी एखादा सिध्द झालेला सिध्दांत मांडून किंवा प्रयोग करून त्यानुसार त्यातील निरीक्षणांचा सखोल अभ्यास करून त्यावरून निष्कर्ष काढावा लागतो.

समाजामध्ये या विषयावर होत असलेल्या चर्चेत यां दोन्हीत गल्लत होतांना दिसते. "हवा डोळ्याला दिसत नाही पण अस्तित्वांत असते, तसाच देवसुध्दा अदृष्य असतो." असे म्हणणे किंवा "प्राध्यापकाचा मेंदू डोळ्याला दिसत नाही म्हणजे तो अस्तित्वांतच नाही." असा युक्तिवाद करणे कथाकीर्तनासारख्या 'शास्त्रां'त कदाचित बसेल पण 'विज्ञानां'त निश्चितपणे नाही. डोळ्याला न दिसणार्‍या हवेच्या वा किंवा प्राध्यापकाच्या मस्तकातल्या मेंदूच्या अस्तित्वाची दुसरी एखादी खूण पटत असते म्हणून त्या अस्तित्वात असतात, त्या प्रमाणेच देवाची खूण ज्याला पटत असेल तर त्याने "तो आहे" म्हणावे, नसेल त्याने "तो आहे" असे वाटल्यास म्हणू नये, पण "तो नाही" असे म्हणण्याची सक्ती नाही. विज्ञानाच्या प्रथेप्रमाणे प्रत्यक्ष पुरावा असेल ते सिध्द होईल पण पुरावा नसेल तर सिध्द होणारच नाही असे नाही. कदाचित उद्या तो पुरावा मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही, पण तोपर्यंत थांबायला हवे. "बाप दाखव, नाही तर श्राध्द कर" असे 'शास्त्र' कदाचित सांगेल, 'विज्ञान' कधी असे सांगत नाही, पण बाप दिसला तर मात्र ते मुलाला त्याचे श्राध्द करू देणार नाही.

1 comment:

shrikrishna said...

आपला लेख आवडला