Thursday, December 18, 2008

झुकझुकगाडी - भारतातली आणि विलायतेतली (भाग ४)


इंग्लंडमधील सगळ्या रेल्वे पूर्वी तिथल्या खाजगी कंपन्यांनीच सुरू केल्या होत्या. दुस-या महायुध्दानंतर तिकडेही समाजवादाचे वारे वाहू लागल्यानंतर त्या कंपन्यांना एकत्र करून 'ब्रिटीश रेल्वे' ही सार्वजनिक क्षेत्रातील एक मोठी कंपनी बनवण्यात आली. मी पहिल्यांदा इंग्लंडमध्ये गेलो तोपर्यंत तिचे 'ब्रिटीश रेल' असे नामकरण झाले होते पण रेल्वेची सारी व्यवस्था तिच्याकडेच होती. गंमत अशी की खिडकीत तिकीट विक्री करणारे, प्लॅटफॉर्मवर फिरतांना दिसणारे, तिकीट तपासणारे, खाद्यपदार्थांची ट्रॉली घेऊन रेल्वेमध्ये येणारे फिरस्ते वगैरे सगळ्याच रूपात रेल्वेचा गणवेश धारण केलेले अनेक भारतीय वंशाचे लोक मला दिसले. त्यांच्या खालोखाल आफ्रिकेतले होते. गोरे लोक अपेक्षेपेक्षा जरा कमीच होते. ते कदाचित ऑफीसमध्ये बसून वरच्या दर्जाचे काम करत असतील आणि कष्टाचे फील्डवर्क त्यांनी या आप्रवासी लोकांवर सोपवले असेल. तिथे दिसलेले भारतीय चेहेरे पाहून एकीकडे बरे वाटत होते आणि दुसरीकडे वाईटही वाटत होते. "आपले लोक इकडे परदेशातली रेल्वे व्यवस्था इतकी छान चालवू शकतात तर आपल्या मायदेशात ती अशी कां नाही?" असा विचारही मनात आला. ही पंचवीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आता इकडची परिस्थितीसुध्दा बरीच बदलली आहे.

समाजवादाचे विचार मागे पडून ब्रिटनमधल्या अनेक सार्वजनिक उद्योगांचे खाजगीकरण किंवा विकेंद्रीकरण केले गेले. अलीकडच्या काळात मी लीड्सला गेलो तोंपर्यंत ब्रिटिश रेल च्या ऐवजी अनेक खाजगी कंपन्यांनी रेल्वे वाहतुकीची सेवा हातात घेतली होती. जीएनईआर, अराइव्हा, व्हर्जिन ही त्यातली कांही महत्वाची नांवे आहेत. रेल्वेलाईन्स, स्टेशने वगैरेचे काम 'रेलट्रॅक' नांवाची एक केंद्रीय संस्था चालवते आणि इतर कंपन्या प्रवाशांची वाहतूक करतात. भारतातील एअरपोर्ट ऑथॉरिटी विमानतळावरील व्यवस्था सांभाळते आणि जेट, किंगफिशर आदि कंपन्या तेथून आपापली विमाने उडवतात तशातला हा प्रकार आहे.

लीड्ससारख्या स्टेशनवरूनसुध्दा तासाभरात निदान आठ दहा तरी गाड्या इकडून तिकडे जातात. गर्दीच्या वेळेत त्या याच्या दुपटीने असतील. म्हणजे मेन लाईनवर लोकलसारखा ट्रॅफिक असतो. पण या गाड्या फारच छोट्या असतात. त्यातल्या ब-याचशा गाड्या फक्त दोनच डब्यांच्या असतात. तरीही त्या पूर्णपणे भरलेल्या मला कधीच दिसल्या नाहीत. भरपूर गाड्या असल्या तरी उतारूंची एवढी गर्दी दिसत नाही. या गाड्यांनासुध्दा लोकलसारखे रुंद दरवाजे असतात आणि ते फक्त दोन तीन मिनिटांसाठीच उघडतात. तेवढ्या वेळात सर्व प्रवासी आरामात चढू किंवा उतरू शकतात. लंडनसारख्या सुरुवातीच्या स्टेशनातदेखील गाडी तासभर आधी प्लॅटफॉर्मवर येऊन उभी रहात नाही. फारफारतर दहा मिनिटे आधी येत असेल.
वेगवेगळ्या कंपन्या चालवत असलेल्या इतक्या गाड्या त्याच रुळांवरून व त्याच प्लॅटफॉर्मवर एकापाठोपाठ आणणे हे तांत्रिक दृष्ट्या फारच कठीण काम आहे. त्यासाठी गाड्यांचे अत्यंत काळजीपूर्वक वेळापत्रक तयार करणे आणि ते कसोशीने पाळणे फारच महत्वाचे आहे्. त्यातून कांही तांत्रिक बिघाडामुळे एक गाडी रखडलीच तर सर्व वेळापत्रक कोलमडून पडू नये यासाठी विशेष दक्षता घेणे व कठोर शिस्तीचे पालन करणे अपरिहार्य ठरते.

ही सेवा फायद्यात चालवणे हा विकेंद्रीकरणामागला मुख्य उद्देश होता. त्यामुळे प्रतिस्पर्धी कंपन्यांमध्ये प्रवाशांना आपल्याकडे खेचण्याची स्पर्धा चाललेली असते. त्यासाठी गाड्या अंतर्बाह्य आकर्षक बनवल्या जातात. कोणी प्रत्येक प्रवाशाला लॅपटॉप चालवण्याची सोय करून देते तर कोणी इयरफोनवरून संगीत ऐकण्याची सुविधा उपलब्ध करते. प्रत्येक स्टेशनवर या कंपन्यांची तिकीटविक्री करणारी त्यांची आकर्षक केबिन्स असतात. त्यात बसण्याची सोय असते, उतारूंना वाटण्यासाठी त्या रेल्वेची वेळापत्रके ठेवलेली असतातच, इतर अनेक माहितीपूर्ण ब्रोशर्स तिथे ठेवलेली असतात. प्रवाशांना निरनिराळ्या खास सवलती उपलब्ध करून देणा-या 'डील्स'ची रेलचेल असते. कोणी तर विशिष्ट दुकानांमध्ये चालणारी डिस्काउंट कूपन्स देतात. यॉर्कची दुकाने, हॉटेले, वस्तुसंग्रहालये वगैरेंच्या किंमतीत कांही टक्के सूट देऊ करणारी कूपन्स एका कंपनीने लीड्स स्टेशनवरल्या काउंटरवर ठेवली होती. आमची तिकीटे आधीच काढून ठेवलेली असल्यामुळे त्याचा लाभ आम्हाला मिळाला नाही. जर तो मिळाला असता तर आम्ही केलेल्या खर्चातले पांच पौंड वाचले असते किंवा सूट मिळवण्याच्या नादात पंचवीस पौंड जास्तच खर्च झाले असते!

इंटरनेटवर कोठलेही तिकीट काढण्याची छान सोय आहे आणि बहुतेक लोक तसेच करतात. पाहिजे असल्यास ते तिकीट कूरियरने घरी मागवता येते किंवा कोणत्याही स्टेशनवरील यंत्रातून ते सवडीनुसार छापून घेता येते. परतीचे तिकीट बहुतेक वेळा फारच स्वस्त असते. जितके आधी तिकीट काढू तितके ते कमी दरात मिळते. शनिवार रविवारी किंवा अवेळी त्याचे दर कमी असतात. "या" गांवाहून "त्या" गांवापर्यंत "अमूक" दिवशी अशी चौकशी केली की संगणकाच्या स्क्रीनवर एक लांबलचक लिस्ट येते. त्यातल्या वेगवेगळ्या स्कीमसाठी वेगवेगळे नियम असतात. कांही तिकीटे कुठल्याही गाडीला चालतात, कांहींची वेळ किंवा तारीख हवी असल्यास बदलून मिळू शकते आणि सर्वात स्वस्तातली तिकीटे अपरिवर्तनीय असतात. त्या यादीतून आपल्याला हवे ते तिकीट बुक करता येते.

मी लीड्सच्या एका टॅब्लॉइडमध्ये या विषयावरील एक बातमी वाचली. त्यात लिहिल्याप्रमाणे लंडनहून ग्लासगोसाठी तिकीटांचे छत्तीस पर्याय आहेत तर शेफील्डला जाण्यासाठी पस्तीस! ग्लासगोचे तिकीट कमीतकमी साडेतेरा पौंड तर जास्तीत जास्त तीनशे चार पौंड इतके आहे. इतक्या खर्चात माणूस विमानाने मुंबईला येऊन परत जाऊ शकेल! शेफील्डसाठी तर फक्त सहा पौंड ते दोनशे सत्तावन पौंड इतकी मोठी रेंज आहे. ते पाहून सर्वसाधारण माणूस चक्रावून गेला आणि चुकीचा निर्णय घेऊन बसला तर त्यात काय नवल?

No comments: