Wednesday, December 17, 2008

झुकझुकगाडी - भारतातली आणि विलायतेतली (भाग ३)

जॉर्ज स्टीफन्सनने तयार केलेल्या रॉकेट इंजिनापासून ते जपानमधील बुलेट ट्रेनच्या विजेच्या इंजिनापर्यंत रेल्वेचा सारा इतिहास मी यॉर्क येथील नॅशनल रेल्वे म्यूजियममध्ये पाहिला आहे. त्याचे थोडक्यात वर्णन या ब्लॉगवर देणार आहे. पंचवीस वर्षांपूर्वी मी जेंव्हा पहिल्यांदा इंग्लंडला गेलो तेंव्हाच विलायतेतली झुकझुकगाडी प्रत्यक्ष पहाण्याचा योगही आला होता. खरे तर मी हीथ्रो विमानतळावरून आधी थेट यूस्टन रेल्वे स्टेशनवर गेलो. मला पुढे कॉव्हेंट्री नांवाच्या गांवाला जायचे होते. लंडन यूस्टनहून तेथे जाण्यासाठी दिवसभर एकापाठोपाठ एक अशा अनेक गाड्या होत्या. सूर्य मावळून अंधार पडण्यापूर्वी तेथे पोचेल अशा एका गाडीची निवड केली आणि तिचे तिकीट काढले.

ते विमानाच्या तिकीटासारखे लांबट आकाराचे तिकीट होते आणि त्यावर तारीख, वेळ, डबा क्रमांक, आसन क्रमांक वगैरे तपशील दिला होता. त्या रेल्वे स्टेशनाची एकंदर रचना आपल्या सी.एस.टी.स्टेशनासारखीच असल्यामुळे आपली गाडी, तिच्यातला डबा आणि आसन शोधायला मुळीच त्रास पडला नाही. जागोजागी मार्गदर्शक फलक लावलेले होते. ते पहात कोणालाही न विचारता मी आपल्या जागेवर जाऊन बसलो. फलाटावर प्रवेश करण्यापूर्वीच तिकीट दाखवावे लागले. तेंव्हा आपण योग्य त्याच मार्गाने चाललो असल्याची खात्रीही पटली.

माझा डबा आपल्या डेक्कन क्वीनमधल्या कुर्सीयानासारखा होता. त्यात कप्पे नव्हते. अमोरासमोर रांगांमध्ये खुर्च्या मांडलेल्या होत्या. त्या काळातल्या दख्खनच्या राणीमधल्या खुर्च्यांवर गडद हिरव्या रंगाच्या मेणकापडाचे वेस्टण असे आणि ती सीट मऊ बनवण्यासाठी तिच्यात काय भरत होते कोणास ठाऊक! विलायतेतल्या गाडीत सुटसुटीत आकाराच्या आणि हलक्या रंगाच्या छान मऊ सीट होत्या. खिडक्याना कांचेची भव्य तावदाने होती. डब्यातली स्वच्छता आणि लख्ख प्रकाश यामुळे अतिशय प्रसन्न असे वातावरण होते. कदाचित माझ्या मनातल्या भावनांचाही तो परिणाम असेल! नंतरच्या काळात आपल्याकडील कांही वातानुकूलित गाड्यांनासुद्धा साधारणपणे अशा प्रकारचे डबे लावले गेले आहेत.

डब्याच्या दरवाजाजवळच एक छोटेसे उघडे केबिन होते. अवजड सामान तिथे असलेल्या रॅकवर ठेवायची व्यवस्था होती. बहुतेक लोकांकडे सुटसुटीत बॅगा होत्या. त्या आपल्या सीटच्या खाली ठेवून किंवा मांडीवर घेऊन सगळे स्थानापन्न होत होते. दोन्ही बाजूंच्या प्रवाशांना दिसतील असे स्क्रीन लावले होते. त्यावर ती गाडी कोणत्या मार्गाने कोठकोठल्या स्टेशनांवर थांबत कुठपर्यंत जाणार आहे ही माहिती दिसत होती. त्याचीच उद्घोषणा करणारे स्पीकरही डब्यात लावलेले होते. आमची गाडी सुटण्याची वेळ होताच ती सुटणार असल्याची घोषणा झाली, सर्व दरवाजे आपोआप बंद झाले आणि गाडीने वेग घेतला. सारे दरवाजे व खिडक्या बंद असल्यामुळे तिचा फारसा खडखडाट ऐकू येत नव्हता आणि ती चांगल्या वेगाने धांवत असतांनाही त्या मानाने तितकेसे धक्के बसत नव्हते. अगदी विमानातल्यासारखी ती कांही हवेवर तरंगत नसली तरी विशेष हेलकावे खात नव्हती. रुळांची पातळी समांतर राखून त्यांमधील अंतर अगदी अचूक ठेवलेले असणार!

इंग्लंडमधली बेभरंवशाची समजली जाणारी हवा माझ्या सुदैवाने त्या दिवशी चांगली होती. बाहेर स्वच्छ सूर्यप्रकाश पडलेला असल्यामुळे निसर्गसौंदर्य पाहता येत होते. उघड्या खिडकीपेक्षा कांचेच्या मोठ्या तांवदानातून बाहेरचे दृष्य जास्त सुंदर दिसते असा माझा नेहमी येणारा अनुभव आहे. कदाचित थंडी, वारा, ऊन वगैरेपासून बचाव होत असल्यामुळे असेल. अधून मधून येणारी स्थानके, तिथे उतरणारे व चढणारे प्रवासी आणि खिडकीतून दिसणारी घरे, बागा, शेते वगैरे न्याहाळण्यात दीड दोन तास निघून गेले. "पुढचा थांबा कॉव्हेन्ट्री येथे आहे सर्व प्रवाशांनी उतरण्यासाठी सज्ज रहावे" अशी घोषणा होताच मीही आपले सामान घेऊन तयारीत राहिलो. स्टेशन येताच डब्याचा दरवाजा उघडला आणि मी आपल्या गंतव्य ठिकाणाला जाऊन पोचलो तो आपल्याबरोबर एक नवा अनुभव घेऊन!

परतीचा प्रवास साधारणपणे तसाच झाला. लंडन स्टेशन येण्यापूर्वी एक धिप्पाड तिकीट तपासनीस आमच्या डब्यात आला. त्याने तिकीट मागून घेतले आणि स्वतःकडेच ठेवले. "लंडनला पोचल्यावर मी काय करू?" असे विचारताच, "गाडीतून उतरा आणि सरळ चालायला लागा." असे उत्तर मिळाले. अंवतीभोवतीचे सगळेच प्रवासी त्याला आपापली तिकीटे देत आहेत हे पाहून घेतले तेंव्हा मला थोडा धीर आला. पण मनात धुकधुक वाटतच होती. लंडनला आमची गाडी पोचली तेंव्हा बाहेर पडण्याच्या एकमेव अरुंद मार्गावर तोच टीसी उभा होता आणि हात हलवून सर्वांना "गुडबाय" करत होता. लंडनला तिकीटे गोळा करण्यासाठी लागणारी कांही मिनिटे त्याने वाचवली होती.
. . . .. . . . . . . . . . .(क्रमशः)

No comments: