Tuesday, December 16, 2008

झुकझुकगाडी - भारतातली आणि विलायतेतली - २

आमच्या गांवापासून सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन निदान पन्नास किलोमीटर दूर होते. आज मी अमेरिकेतल्या अल्फारेटा या गांवात बसून हे लिहितो आहे, इथेसुध्दा आगीनगाडीचे स्टेशन नाही ही एक योगायोगाची गोष्ट आहे. ज्यांनी आयुष्यात कधीही रेल्वेने प्रवास केला नव्हता अशी सुद्धा कांही मंडळी आमच्या भारतातल्या लहान गांवात होती. त्यांचे सगळे आप्तेष्ट पंचक्रोशीतच रहात असल्यामुळे त्यांना रेल्वेने कोठे जाण्याची गरजच पडली नव्हती. त्या मानाने आम्ही सुदैवीच म्हणायचे, कारण शाळेत असतांना पांच सहा वेळा रेल्वेने कोठे ना कोठे जाण्या-येण्याचा योग आला. त्यातले बहुतेक सारे प्रवास कोळशाचे इंजिन जोडलेल्या 'कू'गाडीतूनच केले. "झुकझुक झुकझुक अगीन गाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी " हे वर्णन त्याला अगदी 'फिट्ट' बसायचे. अर्थातच ते आमचे 'पेट्ट' गाणे होते. मनात धडकी भरवणारा आवाज करणारे कोळशाच्या इंजिनाचे ते अवजड धूड, त्याच्या धगधगणा-या भट्टीत सारखे फावड्याने कोळसे टाकणारे मजूर, धुराड्यातून उडणारे धुराचे लोट, मध्येच फुस्स करून सोडलेली वाफ, इंजिनाला अधून मधून पाणी पाजण्यासाठी गाडीने एकाद्या स्टेशनात खूप वेळ उभे राहणे वगैरे सगळ्याच गोष्टींचे आमच्या बालमनाला मोठे अपरूप वाटायचे आणि एका प्रवासाचे रसभरीत वर्णन पुढला प्रवास घडेपर्यंत होत रहायचे.

त्या काळात रिझर्वेशन नांवाची भानगडच नसायची. आमच्या गांवाशी संलग्न असलेल्या छोट्या स्टेशनात गाडी जेमतेम दोन तीन मिनिटे उभी रहायची. त्यामुळे रेल्वे गाडीत चढणे आणि उतरणे हे एक दिव्य असायचे. त्या काळी डब्याच्या खिडक्यांना गज नसत. त्यामुळे आम्हा लहान मुलांना प्लॅटफॉर्मवरून उचलून सरळ खिडकीतून आंत टाकले जाई. आमच्या पाठोपाठ सामान येई आणि त्यानंतर बाईमाणसांना कसेबसे दरवाज्यातून कोंबून मोठी माणसे आंत उड्या मारत. तोपर्यंत गाडी सुटायची शिट्टी होत असे. आंत आल्यानंतर सामानाची मोजदाद करायची. कुणाची ट्रंक कुठे आहे ते पाहून त्या ताब्यात घेऊन आणि पिशव्या, बोचकी, टिफिनचा डबा, फिरकीचा तांब्या वगैरे सगळे आले याची खात्री करून होईपर्यंत पुढल्या स्टेशनवर उतरणा-यांची हालचाल सुरू होत असे. त्यात चपळाई करून आपल्याला बसण्यासाठी जागा मिळवल्यावर शेजारी बसलेल्या काका, मामा, मावशी वगैरेंशी संवाद सुरू होत असे. कधीकधी रेल्वेत भेटलेल्या माणसांबरोबर झालेली मैत्री खूप काळ टिकत असे. "युद्धस्य कथा रम्याः" प्रमाणे रेल्वे प्रवासाच्या गोष्टी घोळवून घोळवून सांगतांना त्यात तल्लीन होणारे कित्येक लोक माझ्या लहानपणी मी पाहिले आहेत. आता रेल्वेच्या काय, विमानाच्या प्रवासाचे देखील फारसे कौतुक कोणालाच राहिलेले नाही.

मुंबईला आल्यानंतर विजेवर चालणारे इंजिन मी पहिल्यांदा पाहिले. खरे तर सगळ्या बाजूने बंद असलेल्या त्या इंजिनात बाहेरून दिसण्यासारखे कांहीच नव्हते. त्याचा "भों" करणारा कर्कश भोंगा तेवढा लक्षात राहिला. पुणे मुंबई प्रवासात खंडाळ्याचा घाट आणि त्यात येणारे बोगदे याचे खूप वर्णन ऐकले होते, वाचले होते आणि त्याबद्दल मनात मोठे कुतूहलही होते. त्यामुळे अगदी डोळ्यात जीव आणून खिडकीबाहेर दिसणारे निसर्गसौंदर्य टिपून घेतले. त्यानंतर कर्जतला मिळणारा दिवाडकरांचा बटाटा वडा म्हणजे अगदी मज्जाच मज्जा! पहिल्या प्रवासाची ती आठवण पुढे निदान पंधरा वीस वर्षे तरी मनात ताजी होती आणि दिवाडकरांचा बटाटा वडा सुद्धा त्या प्रवासाचा अविभाज्य भाग बनला होता. आता बहुतेक वेळा मुंबई पुणे प्रवास द्रुतगती मार्गानेच होत असल्यामुळे वाटेत फूडमॉलवर खाणे होते तेंव्हा दिवाडकरांचा बटाटा वडा आठवतोच.

पुढील आयुष्यात कधी कामाच्या निमित्याने आणि कधी पर्यटन करण्यासाठी आपला देश काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत उभा आणि राजकोटपासून गाँतोक पर्यंत आडवा पहायची संधी मिळाली. त्यातला बराचसा प्रवास रेल्वेनेच झाला. त्यामुळे असतील नसतील त्या सगळ्या प्रकारच्या वर्गांचे डबे आतून पाहून झाले. फक्त 'पॅलेस ऑन द व्हील्स' सारखी खास परदेशी पर्यटकांसाठी तयार केलेली गाडी तेवढी अजून पहायची राहिली आहे. यातल्या राजधानी एक्सप्रेसच्या वातानुकूलित पहिल्या वर्गाच्या राजेशाही प्रवासापेक्षाही मेट्टूपळ्ळेयम यासारख्या अजब नांवाच्या स्टेशनपासून कुन्नूरपर्यंत गर्दीने खचाखच भरलेल्या दुस-या वर्गातून केलेले नीलगिरी पर्वतारोहण माझ्या जास्त लक्षात राहिले आहे.
. . . . . . . . . . .. . . . . . . . . . . . . . (क्रमशः)

No comments: