Monday, December 08, 2008

मुंबई ते अल्फारेटा (भाग २)

मागच्या वर्षी मी युरोपच्या सहलीवर गेलो होतो तेंव्हा जेवण वाढण्याच्या आधी हवाईसुंदरीने प्रत्येक प्रवाशाला स्वागतपेयाची (वाईनची) एक पिटुकली बाटली आणून दिली होती. पुढे करायच्या असलेल्या दीर्घ यात्रेच्या प्रारंभालाच मध्यरात्रीनंतर अवेळी मद्यपान करून पचनसंस्थेचे (आणि स्वतःचे) संतुलन बिघडवून घ्यावे की नाही या संभ्रमात पडल्यामुळे मी तिला (बाटलीला) स्पर्शही केला नव्हता. पण परतीच्या प्रवासात पहिली बाटली संपवून दुसरी मागून घेतली आणि झालेल्या नुकसानीची भरपाई केली होती, तसेच प्रवासाने आलेला शीण घालवला होता. दीड वर्षानंतर अमेरिकेला जातांना त्याची आठवण झाली. पण या वेळी मी वेगळ्या कंपनीच्या विमानात बसलो होतो, तसेच मध्यंतरीच्या काळात वाहतूक उद्योगाच्याच परिस्थितीत बराच बदल झालेला असल्यामुळे अवांतर खर्चाला कात्री लावणे सुरू झाले होते याची झलक लगेच दिसली.

"पहिल्या वर्गातील सर्व प्रवाशांना उत्तेजक पेय देण्यात येईल, जनता श्रेणीतील प्रवासी पांच डॉलर देऊन ते विकत घेऊ शकतील." अशी घोषणा भोजनसेवा सुरू होण्याच्या आधी झाली. ज्या लोकांचे उत्पन्न डॉलरमध्ये आहे अशांना पांच डॉलरचे कांही फारसे मूल्य वाटणार नाही, पण मी जन्मभर काटकसर करून शिल्लक टाकलेले रोकड रुपये मोजून डॉलर विकत घेतलेले असल्यामुळे निदान डॉलरमध्ये खर्च करण्याची संवय होण्यापूर्वी तरी त्यांची रुपयांमधली किंमत डोळ्यासमोर येणार हे साहजीकच होते. त्यामुळे हा 'अवांतर' खर्च करायचे टाळून मी आपला 'डाएट कोक' मागितला. सेवकाने थर्मोकोलच्या एका लहानशा ग्लासात बर्फाचे मोठमोठे खडे टांकून त्यावर कोकाकोला ओतून दिला. हातात मद्याचा प्याला धरलेला आहे अशी कल्पना करून अगदी लहानसे घोट घेत मी त्यातले बर्फ वितळायची वाट पहात राहिलो.

पेयाच्या पाठोपाठ भोजन आले. घरून निघतांना भूक लागलेली नसल्यामुळे विमानाचे चेक इन, इमिग्रेशन वगैरे सोपस्कार आटोपल्यानंतर रात्रीचे जेवण तिथेच घेतले होते. त्यामुळे एवढ्यात पुन्हा भूक लागली नव्हती, मध्यरात्र उलटून गेल्यानंतर पोटात कांही घालण्याची संवय शरीराला नव्हती. त्यामुळे जेवणाची एवढी निकड नव्हती. पण या वेळी अन्नाला नकार दिला तर पुढचा घास केंव्हा मिळेल याची शाश्वती नव्हती. शिवाय आता अमेरिकेला जाईपर्यंत एवी तेवी दिवसाचे सारे वेळापत्रक उलटे पालटे होणारच होते. त्यातल्या त्यात पचायला सोपे जाईल असे शाकाहारी जेवण मागितले.

त्या विमानातले बहुसंख्य प्रवासी भारतीय असले तरी विमानतले सेवक-सेविका श्वेत, अश्वेत आणि मिश्र वर्णाचे पण सगळे अमेरिकन होते. त्यांच्याकडून मिळणा-या शाकाहारी भोजनात उकडलेल्या भाज्या, शिजवलेला पास्ता, मॅकरोनी, चीजचे काप अशा सात्विक (मिळमिळीत) पदार्थांची मला अपेक्षा होती. पण रंगवलेल्या तांदुळाचा भात, रसाळ पातळ भाजी, कसलीशी उसळ यासारखे चक्क भारतीय पदार्थ वाढलेले 'ताट' समोर आले. ते अन्नपदार्थ चविष्ट असले तरी त्यांची चंव थोडी तामसी धाटणीची (झणझणीत) होती. त्यातल्या बटाट्याच्या फोडी, मटार आणि मक्याचे दाणे वगैरे वेचून काढून रंगीत भाताचे चार घास त्यांच्याबरोबर तोंडात टाकले, चिरलेल्या भाज्यांचे काप आणि फळांच्या फोडी तोंडी लावल्या आणि कोक मिसळलेले बर्फाचे पाणी पिऊन ते पोटात ढकलले. गोठवून चामट झालेले पराठे, पु-या किंवा उत्तप्पा नाश्त्याच्या नांवाने खायची मला मुळीच इच्छा नसल्याने नॉनव्हेज ब्रेकफास्टच घ्यायचा असे ठरवून टाकले. प्रत्यक्षात शाकाहारी न्याहारी अपेक्षेपेक्षा चांगली निघाली असे नंतर समजले, पण ऑमलेट, कटलेट वगैरेने युक्त काँटिनेंटल ब्रेकफास्ट खरोखरच छान होता.

या लांबच्या प्रवासात पिण्याच्या पाण्याची काय सोय होईल हा एक चिंतेचा विषय होता आणि निघण्यापूर्वी त्यावर थोडी चर्चासुध्दा झाली होती. भारतातले सारेच प्रवासी आपल्यासोबत पाणी ठेवतात. घरून निघतांना पाण्याची बाटली बरोबर नेली नाही तर स्टेशन किंवा स्टँडवर विकत घेतात आणि घाईघाईत ते जमले नाही तर रेल्वे आणि बसमधल्या प्रवाशांना त्यांच्या जागेपर्यंत पाण्याची बाटली आणून देणारे विक्रेते फिरतच असतात. भारतातल्या हवामानात पाण्याचा घोट पिऊन घसा ओला करण्याची गरज पडतेच. पण युरोप अमेरिकेतले बहुतेक लोक पाणी पीतच नाहीत. आपल्याला तरी कोक किंवा बीयर पिऊन तहान भागल्यासारखे कांही वाटत नाही. त्यामुळे इकडून तिकडे गेल्यानंतर थोडी पंचाईत होते. चार पाच वर्षांपूर्वी आपल्या बरोबर पाण्याची बाटली ठेवता यायची, पण आता सुरक्षिततेच्या कारणांमुळे कोठलाही द्रवपदार्थ केबिन बॅगेजमध्ये नेता येत नाही.

युरोपच्या सहलीवर जातांना पाण्याने भरून सर्व प्रवासात बरोबर ठेवण्यासाठी, कदाचित त्या कोठून आणल्या याची सहप्रवाशांनी कौतुकाने चौकशी करावी म्हणून, पुण्याच्या दोन महिलांनी तुळशीबाग किंवा तत्सम बाजारपेठा धुंडाळून अत्यंत आकर्षक अशा प्लॅस्टिकच्या बाटल्या मोठ्या हौसेने आणल्या होत्या. कशा कोण जाणे, त्या मुंबईपासून व्हिएन्नापर्यंत त्यांच्याबरोबर पोचल्याही होत्या, पण पुढे रोमला जाणा-या विमानात बसण्यापूर्वी झालेल्या सिक्यूरिटी चेकमध्ये तिथल्या ऑफिसरने सरळ त्यांच्या बॅगेतून त्या काढल्या आणि कच-याच्या डब्याच्या स्वाहा केल्या. ते पाहतांना कोमेजलेला त्यांचा चेहरा पाहवत नव्हता. या अनुभवानंतर पाण्याची बाटली बरोबर नेण्यात कांही अर्थ नव्हता.

नुकतेच अमेरिकेला जाऊन आलेल्या एका सद्गृहस्थाने सांगितले की त्याने एक रिकामी बाटली सामानातून नेली आणि जेवणाच्या वेळी ती पाण्याने भरून घेऊन आपल्याजवळ ठेवली होती. मी कांही त्या बाटलीबद्दल जास्तीची चौकशी केली नाही. रात्रीच्या जेवणासाठी विमानतळावर जी पाण्याची बाटली घेतली होती, तिच्यातलेच उरलेले पाणी फेकून देऊन ती बॅगेच्या बाजूच्या कप्प्यात ठेऊन दिली. पण सुरक्षा कर्मचा-याने क्ष-किरणांच्या परीक्षेच्या आधीच बॅगेतून काढून ती टाकून दिली. पण पेयजलाबद्दल जेवढे आधी वाटले होते किंवा सांगितले गेले होते तसे कांही विमानाच्या प्रवासात जाणवले नाही. एक तर तिथली हवा थंडगार असल्याने कंठाला शोष पडत नव्हता आणि दर दोन तीन तासात एकादे तरी शीत किंवा ऊष्ण पेय प्यायला मिळत असल्यामुळे शरीराला आवश्यक तेवढा पाण्याचा पुरवठा होत होता. कदाचित भारतीय प्रवाशांना पाण्याची तहान लागते हे माहीत असल्यामुळे असेल, पण अधून मधून केबिन क्र्यूमधले कोणी तरी पाण्याची मोठी बाटली आणि थर्मोकोलचे ग्लास हातात घेऊन पॅसेजमध्ये चकरा मारून जायचे आणि तृषार्त प्रवाशांची तहान भागवायचे.
.. . . . . . . . . . . . . (क्रमशः)

No comments: