Monday, September 15, 2008

गणेशोत्सव आणि पर्यावरण - ३


आपल्या रोजच्या जीवनात आपण पर्यावरणाचे जितके प्रदूषण करत असतो त्या मानाने व्यक्तिगत पातळीवर गणेशोत्सवात केले गेलेले प्रदूषण अगदी नगण्य होते असे मी मागील भागात लिहिले होते. यातून दोन मुद्दे निघतात. पहिला म्हणजे आपल्या रोजच्या जीवनात आपण पर्यावरणाचे किती प्रदूषण करत असतो आणि गणेशोत्सवात केले गेलेले प्रदूषण अगदी नगण्य असले तरी ते टाळता येईल कां हा दुसरा मुद्दा.
माझ्या बालपणी लहान गांवात घालवलेले जीवन आणि आजची महानगरातली जीवनचर्या यात प्रचंड अंतर आहे. माझ्या लहानपणी सारी धान्ये शेतातून घरी येत असत किंवा वर्षातून एकदा पोत्याने खरेदी केली जात आणि जास्तीची लागलीच तर ती बाजारामधून कापडाच्या पिशवीतून आम्ही आणत असू. जिरे, मिरे यासारख्या वस्तू किराणा मालाचा दुकानदार कागदाच्या पुडीत बांधून देत असे. चहा, कॉफी, काडेपेट्या अशी मोजकीच उत्पादने पॅकिंगमध्ये घरी येत. पॉलिथिलीनच्या पिशव्या ऐकूनदेखील माहीत नव्हत्या. कोठलीही वस्तू वाया घालवायची नाही, शिजवलेले अन्न खाऊनच संपवले पाहिजे असे दंडक असत. भाजीपाल्यातून निघणारी देठे, साली वगैरे गोष्टी जनावरांना खायला घालीत आणि रात्री उरलेले अन्न घेऊन जायला रोज सकाळी भिक्षेकरी दारासमोर येत. एकदा शिवलेले कपडे फाटेपर्यंत घातले जात आणि त्यानंतरसुध्दा त्यातील धडधाकट भागांचा उपयोग पिशव्या किंवा दुपटी शिवण्यात करत असत. त्यामुळे कच-याची टोपली बहुधा रिकामीच असे. त्याशिवाय बंब नांवाचा सर्वभक्षी अग्निनारायण रोज पेटत असे. रिकामी पुडकी, पुड्यांचे किंवा इतर रद्दी कागद, कापडाच्या चिंध्या, नारळाच्या करट्या, भ्ईमुगाच्या शेंगांची टरफले असले सगळे ज्वलनशील पदार्थ त्याच्या भक्ष्यस्थानी पडत. केरातून घराबाहेर टाकले जाणारे टाकाऊ पदार्थ फारच कमी असत, त्यामुळे पर्यावरणाचा विचार करण्याचे कारण नव्हते. 'अशुध्द हवा' किंवा 'हवेचे प्रदूषण' हे शब्दप्रयोग लहानपणी आमच्या कोषात आले नव्हते असे म्हणता येईल. त्यावेळी स्वयंपाकघरात जळाऊ लाकडांचा उपयोग होत असे. ही पध्दत एनर्जी एफिशियंट नसल्यामुळे जास्त कार्बन डायॉक्साईड वायू व धूर तयार करते तसेच लाकडाचा वापर जाळण्यासाठी केल्यामुळे वनस्पतींचा नाश होतो असे पर्यावरणाचा विचार करता दुहेरी तोटे त्यत आहेत. त्यामुळे आजच्या परिस्थितीत ते अक्षम्य ठरेल. पण पूर्वीच्या काळात सगळीकडेच माणसांची वस्ती कमी आणि जंगलांची दाटी जास्त होती. आजही जिथे असे चित्र असेल अशा ठिकाणी हा जास्तीचा कार्बन डायॉक्साईड वायू तिथली झाडे शोषून घेतात आणि इंधनासाठी जेवढी झाडांची तोड होईल त्यापेक्षा जास्त नवी वाढ तिथे होऊन त्यातला समतोल साधला जातो.
आमच्या घरातल्या सोप्याच्या मध्यभागी एक चौकोनी कोनाडा ठेवला होता. आम्ही त्याला 'गणपतीचा कोनाडा' असेच म्हणत असू. दरवर्षी गणेशोत्सवाला गजाननाची मातीची मूर्ती आणून त्यात तिची प्रतिष्ठापना होत असे. कोनाड्याच्या वरच्या बाजूला दोन खुंट्या बसवल्या होत्या. पुठ्ठ्याच्या फ्रेमवर आरास करून ती या खुंट्यांवर टांगत असू. त्यात मधोमध कोनाड्याला फिट होईल अशी सोनेरी कागदाने मढवलेली कमान असे आणि आजूबाजूला सुंदर चित्रे चिकटवून नक्षीकाम करत असू. हा ढांचा कायम ठेवून दरवर्षी नवी आरास करत असू. त्या काळातली छायाचित्रे मला उपलब्ध नसल्यामुळे आठवणीवरून मी एक चित्र तयार केले आहे, त्यावरून थोडी कल्पना येईल. यात पर्यावरणाला बाधा आणणारे कांहीच नव्हते.
आजची परिस्थिती फार वेगळी आहे. कारखाने आणि वाहने यांतून बाहेर पडणा-या दूषित वायूंमुळे वातावरण गढूळ होऊन गेलेले आहे. बाजारातून आणलेल्या प्रत्येक वस्तूबरोबर त्याची अनेकविध वेष्टने येतात. अन्न हे पूर्णब्रम्ह राहिलेले नाही. न आवडलेले पदार्थ खाण्याची सक्ती होत नसल्यामुळे ते टाकले जातात. माणसांच्या गरजा अपरंपार वाढल्या आहेत. रोज नवनवी उत्पादने बाजारात येत असतात. लहान सदनिकांमध्ये जुन्यापुराण्या वस्तू ठेवायला जागा नसते. नवी वस्तू घरात आली की तिला ठेवण्यासाठी जुनी वस्तू फेकून द्यावी लागते. अशा अनेक कारणांमुळे घरातून रोज टोपलीभर (किंवा बास्केटभर) कचरा बाहेर टाकला जातो आणि त्यात प्लॅस्टिकसारख्या विघटन न होणा-या तत्वांचा समावेश असल्याने तो पर्यावरणात साठत जातो. या परिस्थितीमुळे पर्यावरणाला धोका निर्माण झालेला आहे. गणपती उत्सवात त्यात भर पडत असेल पण या निमित्याने त्याची चर्चा होऊन ते मुद्दे नजरेसमोर आले तरी त्याला आळा घालण्याच्या प्रयत्नांना चालना मिळेल. माझा दुसरा मुद्दा या प्रयत्नांशी निगडित असल्याने पुढील भागात त्यावर चर्चा करीन.

. . . . . . .(क्रमशः)

No comments: