Monday, September 15, 2008

गणेशोत्सव आणि पर्यावरण - २


गणेशोत्सवाच्या सुमारास वर्तमानपत्रे आणि टेलिव्हिजन या दोन्ही माध्यमांवर पर्यावरण या विषयावर एवढे विचारमंथन चालू असूनसुध्दा त्याचा म्हणावा तेवढा परिणाम प्रत्यक्षात कां दिसत नाही? या वर्षीचे चित्र पूर्वीपेक्षा फारसे वेगळे का दिसत नाही? या प्रश्नाच्या उत्तराची सुरुवात स्वतःपासून केलेली चांगली. मी स्वतः तरी या वर्षी काय मोठे वेगळे केले? हा प्रश्न कोणीही विचारेलच. तर या गणेशोत्सवात मी काय केले ते आधीच सांगतो.
माझ्या घरच्या देव्हा-यात इतर देवतांसोबत गणपतीची पिटुकली धातूची मूर्ती आहे. लाकूड, दगड, सिरॅमिक, कांच, प्लॅस्टिक वगैरे विविध पदार्थापासून तयार केलेल्या गजाननाच्या कितीतरी सुरेख प्रतिमा आम्हाला कोणी कोणी भेटवस्तू म्हणून दिलेल्या आहेत. त्या घरात जिकडे तिकडे दिसतात, पण त्यांची कधी पूजा होत नाही. तरीही गणेशोत्सवासाठी मी एक वीतभर उंचीची मातीची मूर्ती दरवर्षासारखी आणली, तिची पांच दिवस पूजा अर्चा केली आणि तिचे जलाशयात विसर्जन केले. नेहमीप्रमाणेच एक थर्मोकोलचे मखरही त्यासाठी आणले होते. म्हणजे थोडक्यात मी कांहीच वेगळे केले नाही. आता यापासून पर्यावरणाचे किती नुकसान झाले तेही पाहू.
ज्या तळ्यात आमच्या गणपतीचे विसर्जन केले त्याची लांबी, रुंदी व खोली यांवरून गणित मांडले तर त्याचे घनफळ त्या मूर्तीच्या घनफळाच्या निदान पन्नास साठ लाख पटीने इतके येते. त्या तलावाच्या तळाशी जमलेल्या गाळात मी फक्त ओंजळभर मातीची भर टाकली. वा-याबरोबर उडून येणारी धूळ आणि पाण्याच्या ओघळांबरोबर येणारे मातीचे कण कदाचित काही क्षणात एवढी भर टाकीत असतील. माझ्या गणेशमूर्तीची माती दुरून कोठून तरी आली होती एवढेच. पुले, पाने वगैरेंचे निर्माल्य एका वेगळ्या कुंडात जमा करण्याची व्यवस्था महानगरपालिकेने केलेली होती. ती कांही तळ्यात पडली नाहीत. थर्मोकोलच्या मखराचे सारे भाग सुटे करून व व्यवस्थित कागदात गुंडाळून मी माळ्यावर ठेऊन दिले. त्याचा उपयोग पुढील वर्षी करता येईल. त्यामुळे या वर्षी तरी त्याचा पर्यावरणाला उपसर्ग झाला नाही.
दोन तीन वर्षानंतर कधी तरी ते मखर जीर्ण झाले किंवा जुनाट दिसायला लागले तर मी ते टाकून देईनच, पण ते कांही रस्त्यावर फेकणार नाही. घरातल्या इतर कच-याबरोबर ते महापालिकेच्या कच-याच्या गाडीत जाईल आणि त्याची यथायोग्य विल्हेवाट लागेल. एकादा खड्डा बुजवण्याच्या कामी आल्यास ते जमीनीखाली गाडले जाईल किंवा इन्सिनरेटरमध्ये जळून नष्ट होईल. पर्यावरणाला त्याच्यापासून कांही पीडा होण्याची शक्यता फार कमी आहे. मुळात थर्मोकोलला पर्यावरणाचा शत्रू असे तरी कां मानतात? हवेबरोबर किंवा पाण्याबरोबर त्याचा संयोग होत नाही, ते विरघळत नाही, कुजत नाही, त्याला बुरशी येत नाही की कीड लागत नाही. त्यामुळे त्याचे नैसर्गिकरीत्या विघटन होत नाही. अर्थातच त्यामुळे ते पर्यावरणाला प्रत्यक्षरीत्या प्रदूषित करतही नाही. मात्र त्याच्या टिकाऊपणाच्या गुणामुळे ते सांचत जाते, गटारे व नाले यांत पडल्यास त्यातून होणा-या पाण्याच्या प्रवाहाला अडथळा येतो आणि त्यामुळे ते तुंबलेले पाणी इतरत्र पसरते. हा धोका त्यापासून आहे. थर्मोकोलचा हलकेपणा, टिकाऊपणा आणि धक्के सहन करण्याचा गुणधर्म यामुळे ते पॅकिंगसाठी मोठ्या प्रमाणात वापरले जाते. टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन वगैरे पासून ते मोबाईल फोन आणि कॅमेरा यापर्यंत विविध उपकरणांबरोबर माझ्या घरात आलेल्या आणि मी कच-यात टाकून दिलेल्या थर्मोकोलच्या ठोकळ्यांचे आकारमान मखरातून वापरल्या गेलेल्या थर्मोकोलच्या शीट्सच्या दहापट तरी असेल.
जळल्यावर त्यातून कर्बद्विप्राणील वायू आणि ऊष्णता निर्माण होऊन ते पर्यावरणाचा नाश करतील असे कोणी म्हणतील आणि त्यात किंचितसे तथ्य आहे. पण ते कितपत आहे हेसुध्दा पहायला हवे. कर्बद्विप्राणील वायू आणि ऊष्णता या गोष्टी ज्वलनांच्या सर्व प्रक्रियांमध्ये मध्ये निर्माण होत असतात. एक मखर जाळून त्या जेवढ्या प्रमाणात उत्पन्न होतील त्याच्या कित्येक पटीने त्या रोज तीन्ही त्रिकाळ आपल्या स्वयंपाकघरात निर्माण होत असतात. पूजा आणि आरती करतांना लावलेल्या निरांजन, समई, उदबत्ती, कापूर वगैरेंच्या ज्वलनातूनसुध्दा पर्यावरणाचे प्रदूषण होतच असते पण त्याचे प्रमाण अत्यल्प असते. आपले अन्न शिजवण्यात ज्वलन होतेच पण पचलेल्या अन्नाचे मंद ज्वलन आपल्या शरीरात होत असते. चमचाभर तुपाचे ज्वलन निरांजनाच्या ज्योतीत होऊन त्यातून जेवढा कार्बन डायॉक्साईड वायू बाहेर पडेल तेवढाच वायू आणि तेवढीच ऊष्णता ते चमचाभर तूप खाल्यानंतर आपल्या शरीरातून बाहेर पडेल. आपण आरती केल्यामुळे पर्यावरण दूषित केल्याबद्दल जर कोणाला अपराधीपणा वाटत असेल तर त्याने वाटल्यास त्या दिवशी भातावर चमचाभर तूप घेऊ नये.
थोडक्यात सांगायचे झाल्यास आपल्या रोजच्या जीवनात आपण पर्यावरणाचे जितके प्रदूषण करत असतो त्या मानाने व्यक्तिगत पातळीवर गणेशोत्सवात केले गेलेले प्रदूषण अगदी नगण्य होते यामुळेच ते थांबवावे असे वाटले नाही.
(क्रमशः)

No comments: