Tuesday, August 12, 2008

माझीही अपूर्वाई - भाग ५

मी जिथे उतरलो होतो ते हॉटेल हा एक तीन किंवा चार बेडरूम्सचा फ्लॅट होता. हॉलमध्येच दरवाजाजवळ एक टेबल खुर्ची मांडून व बाजूला छोटेसे पार्टीशन करून कामचलाऊ ऑफीस बनवले होते. त्याच्या पलीकडे चार खुर्च्यांचे डायनिंग टेबल होते. भिंतीला लागून एक लांबट आकाराचे टेबल होते. त्यावर जॅम, सॉस वगैरेच्या बाटल्या आणि क्रॉकरी ठेवली होती. दुसरे दिवशी सकाळी त्यावर कॉर्न फ्लेक्स, टोस्ट, बटर वगैरे मांडून ठेवलेले मिळाले. एका बाजूला किचन होते. त्यात मी पूर्वी कधी न पाहिलेल्या आकारांच्या ओव्हन्स, ग्रिल्स व हॉट प्लेट्स होत्या. दुस-या बाजूला पॅसेजला लागून असलेल्या सेल्फकंटेन्ड बेडरूम्समध्ये दोन दोन लोकांच्या रहाण्याची व्यवस्था होती. माझ्या वास्तव्याच्या काळात तरी मला दुसरा कोणी पाहुणा भेटला नाही. कदाचित मी फारच थोडा वेळ हॉटेलात घालवत असल्यामुळेही तसे झाले असेल. वरच्या मजल्यावर मालक रहात होता व तो आपल्या कुटुंबाच्या सहाय्याने ते हॉटेल चालवत होता. इतर कोणी नोकरवर्ग केंव्हाही दिसलाच नाही. अशा प्रकारची फॅमिली रन हॉटेल्स युरोपात चांगलीच प्रचलित आहेत व मध्यमवर्गीय प्रवाशांना अल्प खर्चात चांगली रहाण्याची सोय ती उपलब्ध करून देतात.

ते हॉटेल पाहिल्यावर मला आपल्याकडील देवस्थानांचे पूजारी भाविक यात्रेकरूंची आपल्या घरी उतरण्याची सोय करतात त्याची आठवण झाली. मात्र तिकडचा प्रकार एकदम पॉश व प्रोफेशनल होता. सगळ्या खोल्या चकाचक स्वच्छ होत्या. जमीनीवर गालिचा अंथरलेला, खिडक्यांना पडदे लावलेले होते. बेडरूम व बाथरूममध्ये सर्व आधुनिक सुखसोयी उपलब्ध होत्या. अगदी छोटेखानी हॉटेल असले तरी त्याचे नांव, पत्ता, फोन नंबर वगैरे सुबक अक्षरात छापलेली त्याची स्टेशनरी होती. इतकेच नव्हे तर चादरी, टॉवेल्स, बेडशीट्स, कप, ग्लास, कांटे, चमचे वगैरे सगळ्या गोष्टींवर हॉटेलचे नांव त्याच्या बोधचिन्हासह छापलेले किंवा कोरलेले होते. निव्वळ याच गोष्टी पाहिल्या असत्या तर हे एक मोठे तारांकित हॉटेल असेल असेच कोणाला वाटले असते. अशा प्रकारच्या हॉटेलात सर्वसामान्यपणे फक्त ब्रेकफास्टची सोय असते. किंबहुना 'बी अँड बी' (बेड अँड ब्रेकफास्ट) याच नांवाने ती ओळखली जातात असे म्हणता येईल. मी सांगितले असते तर कदाचित त्याने मला रात्री आपल्यातलेच चार घास जेवणसुद्धा खाऊ घातले असते असे वाटत होते, पण मलाच भूक नव्हती आणि झोपण्यापूर्वी दोन चार बिस्किटे किंवा केक खाऊन झोपायचे असे मी ठरवले होते.

थोडी विश्रांती घेऊन, कपडे बदलून फिरायला बाहेर पडलो. घड्याळात संध्याकाळचे आठ वाजले होते. आपल्याकडे या वेळेस काळोख झालेला असतो. तिथे मात्र स्वच्छ ऊन पडले होते. न्यूर्टिंजन हे फारच छोटे गांव दिसले. एका टोकापासून दुस-या टोकापर्यंत चालत जायला दहा पंधरा मिनिटे सुद्धा लागली नाहीत. बहुतेक इमारती दोन किंवा तीन मजली होत्या. त्यात कांही बंगले आणि कांही अपार्टमेंट्स होते. झोपड्या किंवा टपरी नव्हत्याच. सगळीकडे व्वस्थित कॉंक्रीट किंवा डांबरी रस्ते आणि पेव्ह्ड फूटपाथ होते. रस्त्याला लागून असलेल्या बहुतेक इमारतींच्या दर्शनी भागात दुकाने होती. विमानतळावर पाहिले होते तशाच प्रकाराने सगळ्या दुकानांत कांचेच्या आड सर्व वस्तू मांडून ठेवलेल्या होत्या. त्या इवल्याशा गांवात रेफ्रिजरेटर व टी.व्ही.ची दुकाने सुद्धा होती. एक मोटारगाड्यांचे शोरूम पाहून चाट पडलो. कांही दुकानांत प्रकाश दिसत होता पण आंत एकही माणूस नव्हता. तिकडे सगळी दुकाने ऑफीस टाईमप्रमाणे सकाळी उघडतात व संध्याकाळी बंद होतात म्हणे. या काळांत सारीच मंडळी आपापल्या ऑफीसात असणार. त्यामुळे ती दुकानांत केंव्हा जातात आणि दुकानात ऑफीसटाईममध्ये कोणते ग्राहक येतात हे कोडे कांही मला सुटले नाही. आणि मला पाहिजे असलेल्या कुकीज व बिस्किटे कांचेतून दिसत होती पण हांतात येत नव्हती.

फिरता फिरता एका आडरस्त्यावर आपल्याकडे वडापावाचा ठेला असतो तसा एक प्रकार दिसला. त्याच्या समोर एक जोडपे उभे होते. ठेल्यावरच्या आजीबाई तोंडाने जर्मन भाषेत मला अगम्य अशा गप्पा हंसत खिदळत मारता मारता हांताने पावाला चिरून त्यात बटर, चीज, लेट्यूसची पाने वगैरे कांही कांही कोंबत होती. सगळे सारण भरल्यावर तो पदार्थ मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये कांही सेकंद भाजून तिने त्यांना खायला दिला. ते दृष्य पाहून झाल्यावर मलाही तोच पदार्थ बनवून द्यायला मी तिला खुणेने सांगितले. तिला ते बरोबर समजले व तिने त्याबरहुकूम ते सँडविचवजा बर्गर तयार करून मला दिले आणि समोरच्या गल्ल्यातले एक नाणे दाखवून त्याची किंमत सांगितली. असा 'शब्देविण संवादू' साधून त्या वेळेची सोय तर झाली.

दुसरे दिवशी सकाळी मी ठरलेल्या वेळेआधीच तयार होऊन नाश्ता घेऊन बसलो होतो. माझा मित्र बरोबर वेळेवर हजर झाला व मला कारखान्यात घेऊन गेला. प्रवेशद्वारापाशीच जर्मनी व भारत या दोन्ही देशांचे ध्वज उभारले होते आणि माझे स्वागत करणारा फलक लावला होता. हा एक औपचारिक प्रकार होता, दुस-या दिवशी त्याच जागी आणखी कोणाचे नांव असेल व ते सुद्धा कोणी वाचणार नाही याची मला कल्पना होती. तरीही त्या ठिकाणी आपले नांव वाचतांना बरे वाटले. आंत गेल्यावर थेट मार्केटिंग विभागाच्या प्रमुखाची भेट घेतली. पाहुण्यांची व्यवस्था पाहणे ही त्याला नेमून दिलेली जबाबदारी होती. हवा पाणी, प्रवास वगैरेवर दोन तीन वाक्ये बोलून होताच त्याने एक टाईप केलेला कागद माझ्या हांतात दिला. माझ्या भेटीतील प्रत्येक दिवसाचा तासागणिक कार्यक्रम त्यावर दिला होता. एखाद्या शाळेच्या वर्गाचे वेळापत्रक असावे असे ते दिसत होते. दररोज किती वाजता मी कोणत्या खात्याला भेट द्यायची व तेथील कोणता अधिकारी माझ्याशी चर्चा करेल ते त्याच्या नांवानिशी लिहिले होते. अर्थातच या कागदाच्या प्रती सगळ्या संबंधित मंडळींना दिलेल्या असणार हे उघड होते.

त्या कागदावर ओझरता दृष्टीक्षेप टाकताच मी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. या कार्यक्रमाची आंखणी अत्यंत विचारपूर्वक केलेली होती व मला अभिप्रेत असलेले सर्व उद्देश त्यांत नमूद केलेले होते याबद्दल त्यांचे आभार मानले व तो अजेंडा बनवणा-याचे तोंडभर कौतुक केले. पण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कोणतीही नवीन गोष्ट करीत असतांना त्यांतील कांही प्रक्रिया नीटपणे समजून घ्यायच्या असतात, हातात असलेल्या कामातील सध्याच्या समस्या विचार विनिमयाने सोडवाव्या लागतात, संभाव्य अडचणीवर उपाय शोधून ठेवणे इष्ट असते, उभयपक्षांना हव्या असलेल्या सुधारणा व त्यांनी केलेल्या सूचना यांवर मनमोकळेपणाने चर्चा करायची असते. यासाठीच तर मी साता समुद्रापलीकडून इकडे आलो होतो. अशा प्रकारच्या गोष्टींना मिनिटांचे कडक बंधन घालता येत नाही. कांही छोटेसे प्रयोगही करून पहायचे असतात, त्यासाठी तात्पुरती व्यवस्था करावी लागते. या सगळ्या गोष्टी मर्यादित वेळेत करण्यासाठी मी एक नेटवर्क बनवून आणले होते. ते त्यांना देऊन आपण प्रत्येक दिवसाचा कार्यक्रम व साध्य ठरवून घेऊ पण त्याला तासांचे बंधन नको, त्यासाठी रोज इथे वाटेल तितका वेळ थांबायची माझी तयारी आहे असे सांगितले. त्यांनीही या सूचनेचे आनंदाने स्वागत केले. रोज रात्रीच्या भोजनापर्यंत थांबून आणि कधी त्यानंतरही पुन्हा परत येऊन तास दोन तास काम करून आम्ही यादीमधील सर्व कामे मनासारखी पूर्ण केली. शेवटच्या दिवशी मात्र फक्त मागील दिवसात केलेल्या कामाचा आढावा घेऊन मिनिट्स ऑफ मीटिंग बनवणे एवढेच उरले होते. त्याचा कच्चा मसूदासुद्धा तयार करून ठेवला होता. उभयतात कांही मतभेद नसल्यामुळे ते काम झटपट पार पडले व मला अर्धा दिवस उसंत मिळाली.

मी भेट देत असलेला कारखाना न्यूर्टिंजनसारख्या तीन चार खेडेगांवांच्या मधोमध मोकळ्या जागेवर उभारलेला होता. त्या भागात खास प्रेक्षणीय असे कांही नव्हते. माझ्या दृष्टीने पाहता तो देश, तिथली जमीन, त्यावरची शेते, झाडे झुडुपे, सतरा अठरा तास लख्ख उजेड असलेला दिवस, मी झोपल्यानंतर सुरू होऊन जाग येण्यापूर्वीच संपणारी, कधीच दृष्टीला न पडलेली काळोखी रात्र, प्रदूषणापासून मुक्त, शुद्ध थंडगार कोरडी हवा, तिथली धष्टपुष्ट गौरकाय माणसे, त्यांची घरे, दुकाने, सपाट व प्रशस्त रस्ते, त्यावरून सुसाट वेगाने धांवणारी वाहने वगैरे सगळेच अगदी नवे होते. पण तेसुद्धा जाता येता दृष्टीला पडत होते तेवढेच. सर्वसामान्यपणे पर्यटक जे कांही निवांतपणे पहातात त्यातले मी कांहीच पाहिले नव्हते. माझ्या यजमानांनी याची थोडीशी भरपाई करायची असे ठरवले. सगळे ऑफीशियल काम संपल्यानंतर एका उत्साही तरुणाला माझ्यासोबत पाठवून जवळच्या स्टूटगार्ट शहराचे दर्शन घडवून आणले.

जर्मनीतली भेट यशस्वीरीत्या संपल्यानंतर दौ-याचा पुढचा भाग इंग्लंडमध्ये घालवायचा होता. पहाटे उठून टॅक्सीने स्टूटगार्ट एअरपोर्टवर गेलो. बाहेर उजाडले असले तरी तिथे सगळीकडे सामसूम होती. लंडनला जाण्यासाठी पॅनॅम एअरलाईन्सचे तिकीट माझ्याकडे होते. पण तिचा काउंटर कुठे सापडत नव्हता. लुफ्तान्साचा काउंटर उघडलेला होता. तिथे चौकशी करायला गेलो तर त्यांचे विमान लगेच निघण्याच्या तयारीत आहे व मी त्याने जाऊ शकतो असे सांगितले. माझ्याकडच्या तिकीटाचे फॉईल काढून घेऊन बोर्डिंग कार्ड हांतात दिले. मला तर आश्चर्य व्यक्त करायलाही वेळ नव्हता. धांवत पळत जाऊन विमान पकडले आणि दीड दोन तासात लंडनच्या सुप्रसिद्ध हीथ्रो विमानतळावर उतरलो.

No comments: