Thursday, July 24, 2008

आमच्या छकुल्या (भाग १)


आमच्या घरी जेंव्हा या आमच्या छकुल्या नाती जन्माला आल्या तेंव्हा काय झालं?

माझ्या अंगणांत दोघी मुग्ध कलिका या आल्या । घरदार परिसर आनंदाने ओसंडला ।।

सगळं घर आता त्यांच्याभोवती फिरायलाच नव्हे तर नाचायला बागडायला लागलं. आमच्यापुढे पहिला प्रश्न होता तो म्हणजे त्यांची नांवे काय बरं ठेवायची?

दोन अर्थपूर्ण नांवे शोधाया लागल्या बुद्धी । कुणी सांगे अंजू मंजू, सोना मोना, रिद्धी सिद्धी ।।

मनाजोगती मिळाली जोडी शोधता धुंडता । एक इरा सरस्वती दुजी ईशा दुर्गामाता ।।

त्यांच्या बाळलीला दिवसेगणिक वाढत गेल्या. आम्ही कौतुकाने त्या पहात होतो. आज काय नजरेला नजर देऊन पाहिलं, आज पहिला हुंकार दिला, आज कोण कुशीवर वळली, आज कोण पालथी झाली, आज पुढे सरकली, आज मुठीत बोट पकडलं, आज हांक मारतांच हंसून साद दिली असं कांही ना कांही नवं नवल
दोघींच्या बाबतीत रोजच घडत होतं. बघता बघता दोघी रांगायला लागल्या, आता जमीनीवर कोठली वस्तू ठेवायची सोय नव्हती. त्या उचलून थोड्या वर ठेवीपर्यंत दोघीही आधार धरून उभ्या रहायला लागल्या.

दोघी झाल्या भारी द्वाड करतात ओढाओढ । आरडाओरड मस्ती, झोंबाझोंबी चढाओढ ।।

दांडगाईला कळेना कसा घालावा आवर । उचलून ठेवायाच्या सा-या वस्तू उंचावर ।।

असंच पहाता पहाता वर्ष उलटून गेलं. दोघी एकमेकीच्या मागे पळायला लागल्या. त्यांच्या निरर्थक गोंगाटातून अर्थपूर्ण शब्द उमटू लागले. शब्देविण संवादू कडून सुसंवादाकडे पावले पडायला लागली. त्या दोघीही आवडीने गाणी ऐकायला लागल्या आणि आपल्या बोबड्या उच्चारातून ती म्हणायला लागल्या, त्याच्या तालावर हातवारे करीत पाय नाचवू लागल्या. पण थोड्याच दिवसांनी त्यांच्या वडिलांची, म्हणजे माझ्या मुलाची, इंग्लंडमध्ये बदली झाली आणि आमच्या छकुल्या त्याच्याबरोबर परदेशी चालल्या गेल्या. त्यांना जेमतेम कामापुरते मराठी शब्द समजू लागले होते. तरीही त्या देशात गेल्यावर तिकडची भाषा सहज शिकून गेल्या. आता वेबकॅम व ईमेलमधून फोटो दिसत, फोनवर व चॅटिंगमधून बोलणे होई. त्यावरून समजलं की,

आंग्ल भाषेतून घेती पारंपरिक संस्कार । कृष्ण खातसे बटर, देवी लायनवर स्वार ।।

पाखरे उडून गेली परी किती दूर दूर । बोल बोबडे ऐकाया मन सदैव आतुर ।।

ईमेलमधून येती छायाचित्रे मनोहर । त्यांचे संग्रह करून पहातसे वारंवार ।।

असंच आणखी एक वर्ष होत आलं. तेंव्हा मात्र अगदी राहवेना. कामाच्या व्यापातून मुक्तता मिळाली होती. तेंव्हा सरळ तिकीटं काढली आणि इंग्लंड गाठलं.


(क्रमशः)

No comments: