Saturday, July 26, 2008

आमच्या छकुल्या (भाग ३)


आमच्या ईशा आणि इरा या दोन व तीन वर्षांच्या झाल्या त्या वेळचे त्यांचे वाढदिवस त्या इंग्लंडमध्ये असतांना आले. तिथल्या भारतीय मित्रमैत्रिणींना बोलावून भारतात करत असायचे तशाच पध्दतीनेच ते तिथे साजरे केले गेले. आम्हीही टेलीफोन, इंटरनेट, वेबकॅम वगैरे माध्यमातून त्यात जेवढा सहभाग करता आला तेवढा करून घेतला. चौथ्या वर्षपूर्तीच्या दिनापर्यंत त्या भारतात आल्या होत्या आणि पुण्याला आमचे जाणे येणे सारखे चाललेले असे. त्यामुळे वाढदिवसाला जाणे झालेच.


आजकालची लहान मुले आपले नांव सांगायला लागतात त्याच्यापाठोपाठच आपली जन्मतारीखसुद्धा सांगायला शिकतात. आमच्या ईशा आणि इरा यांना आपापल्या नांवांमधल्या 'श' आणि 'र' चा उच्चारसुद्धा नीट जमत नव्हता तेंव्हापासून त्या "सोळा जूनला माझा बड्डे आहे." असे सांगताहेत. 'सोळा' ही एक 'संख्या' आहे आणि 'जून' हे एका 'महिन्या'चे नांव आहे एवढे कळण्याइतकी समज त्यांना त्या काळात आलेली नव्हती कारण संख्या आणि महिना या संकल्पनाच त्यांना कळलेल्या नसणार, पण 'बड्डे' म्हणजे 'धमाल' एवढे त्यांना पक्के समजलेले होते. त्या दिवशी छान छान कपडे घालायचे, हॉलमध्ये भिंतीवर रिबिनी, फुगे वगैरे लावायचे, खूप मुलांना जमवून मनसोक्त दंगा करायचा, केक कापायचा, 'हॅपी बर्थडे'चे गाणे म्हणायचे, टाळ्या वाजवायच्या, यम्मीयम्मी गोष्टी खायच्या. सगळे त्या 'बड्डे बॉय' किंवा 'बड्डे गल्' ला 'विश' करतात, त्यांना 'प्रेसेंट्स' देतात वगैरे सगळा तपशील त्यांना पाहून पाहून ठाऊक झाला होता. त्यामुळे आपले वाढदिवस नेहमी नेहमी येत रहावेत असे त्यांना वाटायचे. अधून मधून त्या आपल्या मित्रमैत्रिणींच्या बर्थडे पार्ट्यांना जाऊन तिथे धमाल तर करायच्याच, इतर दिवशी आपल्या भातुकलीच्या खेळात मिकी उंदीरमामा, टेडी अस्वल किंवा बार्बी भावली यांचे साग्रसंगीत वाढदिवस 'मनवत' असत.


आता त्या शाळेत जायला लागल्या होत्या. वाढदिवसाच्या दिवशी सकाळी शाळेचा गणवेश न घालता नवा ड्रेस घालून आणि शाळेत वर्गातल्या मुलींना वाटण्यासाठी चॉकलेट्सचे डबे घेऊन त्या शाळेला गेल्या. शाळा सुरू झाल्यानंतर त्यांच्या वर्गात पहिला वाढदिवस त्यांचाच आला होता का काय कोण जाणे, शाळेत बर्थडे कसा साजरा करतात हे त्यांनाही ठाऊक नव्हते आणि आम्हालाही. शाळेतून घरी परत आल्यावर त्यांनी थोडक्यात शाळेतली गंमत सांगितली पण त्या थोड्याशा हिरमुसलेल्या वाटल्या. खोदून खोदून विचारल्यावर ईशाने सांगितले, "स्कूलमध्ये आपला बड्डे झाला, पण त्याची पाट्टीच नाही झाली!" या वर्षीचा वाढदिवस हा असाच होणार की काय असे तिला वाटले होते. "हा फक्त शाळेतला बर्थडे झाला, आतां संध्याकाळी आपण घरी पार्टी करू, त्यात तुमचे फ्रेंड्स, अंकल, आँटी वगैरे खूप लोक येणार आहेत. त्यावेळी घालायसाठी दुसरे नवीन ड्रेस आणले आहेत. तेंव्हा आपण नाच, गाणी, खेळ वगैरे सगळे करायचे आहे. " असे समजाऊन सांगितल्यानंतर त्यांची कळी खुलली.

No comments: