Friday, July 25, 2008

आमच्या छकुल्या (भाग २)


आम्ही उभयता लीड्सला जाऊन पोचलो पण आमचे सामान कांही तिथपर्यंत आले नाही. त्यामुळे आता काय करायचे याची चौकशी करून ऑफीसात जाऊन रीतसर तक्रार नोंदवण्याचे सोपस्कार पूर्ण करून बाहेर येईपर्यंत बराच वेळ लागला आणि सगळा मूडही गेला होता. पण फरमध्ये नखशिखांत गुंडाळून घेऊन कडाक्याच्या थंडीत आमची वाट बघत उभ्या असलेल्या छकुल्यांना पाहिले आणि सगळा मनस्ताप व थकवा कुठच्याकुठे पळून गेला. घरी पोचेपर्यंत ईशा व इराबरोबर नव्याने छान गट्टीसुद्धा जमून गेली. खास त्यांच्यासाठी हौसेने आणलेल्या वस्तू तर सामानाबरोबर राहिल्या होत्या पण त्याने कांही बिघडले नाही. नंतर यथावकाश आमचे सामानसुमान घरपोच पोचले.
घरी आल्या आल्या दोघीही एक चित्रमय पुस्तक घेऊन जवळ आल्या व त्यातील गोष्ट सांगायचा हट्ट धरून बसल्या. जेमतेम अडीच वर्षाच्या वयात त्यांना अक्षरज्ञान कोठून असणार? चित्रे बघत बघत बाजूला लिहिलेली गोष्ट वाचून सांगायची. त्यांच्याकडे असलेल्या सा-या पुस्तकातल्या सगळ्या गोष्टी त्यांना माहीत होत्या. सिंड्रेलाच्या सावत्र आईऐवजी 'तिची काकू' म्हंटले तर लगेच हटकायच्या. तरीसुद्धा त्या गोष्टी पुनःपुनः ऐकायचा भयंकर नाद! एक गोष्ट सांगून झाल्यावर मी इराला म्हंटलं,"आता तू सांग." तिने लगेच मी सांगितलेल्यातला पन्नास साठ टक्के भाग घडा घडा आपल्या बोबड्या बोलात सांगून टाकला. ईशा आधी पळून गेली. परत आल्यावर तिने ऐटीत ते पुस्तक हातात धरले आणि वाचायला येत असल्याचा आव आणत "वन्स अपॉन ए टाईम" पासून सुरुवात करून मध्ये थोडा वेळ "ग्लंग्लॅंग्लींग्लूं" वगैरे इंग्रजी टोनमध्ये म्हणून "दे लिव्ह्ड हॅपीली देअरआफ्टर" करून टाकलं. कधीकधी त्या आपल्या मनाने गोष्ट रचून सांगायच्या. या बाबतीत इराची कल्पनाशक्ती अफाट आहे. आपल्या सभोवतालचे खरे विश्व तसेच पुस्तकातून आणि टी.व्ही.वर दिसणारे काल्पनिक विश्व यातील पात्रांचे बेमालुम मिश्रण ती करत असे. तिच्या गोष्टीतली सिंड्रेला पार्टीला जाण्याऐवजी जंगलात फिरायला गेली, तिथे तिला मोगली भेटला, त्याने तिला केक दिला. ती दोघे मिळून स्नोव्हाईटकडे जेवायला गेली. वाटेत एक नदी लागली. तिच्या काठावर लिटल मर्मेड बसलेली होती. एक शार्क मासा तिच्या अंगावर धांवून आला, इराने त्याला घाबरवून पळवून लावले, त्याबद्दल आईने तिला चॉकलेटचा डबा दिला. त्यातल्या गोळ्या तिने शाळेतल्या मित्रामैत्रिणींना दिल्या तसेच पोस्टमन पॅट आणि शॉपकीपरलाही दिल्या. अशा प्रकारे ती वाटेल तिकडे मनसोक्त भरकटत जात असे आणि कंटाळा आला की कोठला तरी प्रिन्स घोड्यावरून येऊन सिंड्रेलाला घेऊन जायचा. त्यानंतर दे लिव्ह्ड हॅप्पीली देअरआफ्टर.
इंग्लंडमधील इतर लोकांबरोबर त्यांना येत होती तेवढी इंग्लिश भाषा त्या तिकडल्या उच्चाराप्रमाणे बोलायच्या. आमच्यासाठी मात्र त्यांनी आपली एक वेगळीच भाषा बनवली. सुचेल ते इंग्रजी क्रियापद लावून पुढे ती क्रिया करते म्हणायच्या. "मी ईट करते, ड्रिंक करते, स्लीप करते" वगैरे. 'र' चा उच्चार करता येत नसल्याने इरा आपले नांव 'इवा' सांगायची तर ईशा तिला 'इया' म्हणायची. मराठी शब्दच मुळात कमी माहीत असतांना त्यातला लिंगभेद व वचनभेद कसा कळणार? आम्ही तिला "येतेस कां" म्हंटले तर ती आम्हालासुद्धा "येतेस कां" असंच म्हणणार. त्या वयातली बहुतेक मुले असेच बोलतात. एकदा इरा मला मला "खव्वी मव्वाठी गोष्ट सांग" असे म्हणाली. मी आपली त्यांना काऊ चिऊची गोष्ट सांगितली. त्यातही मेण आणि शेण म्हणजे काय हे त्यांना समजणे कठीणच होते, ते कसेबसे सांगितले. ती गोष्ट त्यांना कितपत समजली ते पहावे म्हणून मी त्यांना विचारले "चिऊ कशी करते?" खिडकीबाहेर चिवचिवाट करणा-या चिमण्या त्यांच्या चांगल्या ओळखीच्या होत्या. इराने लगेच दोन्ही हात पसरून पंख फडफडण्याची क्रिया करीत चिवचिव करून दाखवली. मी जेंव्हा विचारले "काऊ कसं करतो?" तेंव्हा लगेच ईशा हंबरली "मूऊऊऊऊ". त्या दोघींनी इंग्लंडमध्ये कधी कावळा पाहिलाच नव्हता तेंव्हा त्यांना काऊ म्हणजे त्यांना चित्रात पाहिलेली गायच वाटली!
ईशा व इरा या दोघी जुळ्या बहिणी असल्या तरी एकमेकीपासून भिन्न आहेत. इरा जास्तच गोरी, उंच व थोडी दांडगट आहे. ती ईशाच्या हातातली वस्तु हिसकावून घ्यायचा प्रयत्न करते. ईशा चपळाईने तिची खोडी काढून पळून जाते किंवा तिची वस्तु पळवून लपवून ठेवते. असा टॉम आणि जेरीचा खेळ त्यांच्यामध्ये चालू असतो. पण दोघींचाही एकमेकीवर खूप जीव आहे. कुठलीही गोष्ट कधीही दुसरीला मिळाल्याखेरीज एकटीने खात नाहीत. सगळ्या गोष्टी लोकांना दाखवायची इराला खूप हौस आहे. तिला संधी मिळायचा अवकाश, लगेच तिचे नाचणे व गाणे सुरू होऊन जाते पण ईशा मात्र तिची इच्छा असेल तेंव्हाच अप्रतिम गाणार किंवा नाचणार. इराची स्मरणशक्ती चांगली आहे. ऐकलेले शब्द समजू देत किंवा नाहीत ते उच्चार तिच्या लक्षात राहतात. ईशाची आकलनशक्ती चांगली आहे. कुठलीही गोष्ट तिच्या चटकन लक्षात येते. तिला तालासुराची उपजत जाण आहे. त्यामुळे ती सारेगमचे आरोह व अवरोह व्यवस्थित दाखवते. इरा सरगममधली सगळी अक्षरे कधीकधी एकाच सुरात म्हणून टाकते, पण इंग्रजी व मराठीतलीच नव्हेत तर अनेक हिंदी गाणीसुद्धा तिला चालीवर आणि मधल्या म्यूजिकसकट पाठ आहेत.
दोन वर्षांपूर्वी ती मंडळी भारतात परतल्यावर आधी मुंबईला राहून सगळी नीट व्यवस्था झाल्यानंतर पुण्याला गेली. तिकडून येतांना "इंडियाला जायचंय्" असे बोलणे झाले असेल. त्यामुळे मुंबईतले आमचे घर म्हणजे इंडिया अशीच ईशा व इरा या दोघींची समजूत झाली होती. देश ही संकल्पना त्या वयात समजणे कठीण होते. त्यामुळे पहिल्यांदा आम्ही त्यांच्याकडे पुण्याला गेलो तेंव्हा इरा म्हणाली होती, "मला पण तुमच्याबरोबर इंडियाला यायचंय्." त्यानंतर जेंव्हा त्यांच्याकडे गेलो होतो तेंव्हा परत निघायच्या वेळी ईशा म्हणाली, "आजोबा, तुला माहीत आहे कां की इथं सुद्धा इंडियाच आहे. मग तू पण इथंच कां नाही रहात?"
(क्रमशः)

No comments: