Wednesday, April 09, 2008

बोलू ऐसे बोल (भाग ४)

कसे बोलावे यावर "सत्यम् ब्रूयात् प्रियम् ब्रूयात् न ब्रूयात् सत्यमप्रियम् । प्रियम् च नानृतम् ब्रूयात् एवं वदति पंडितः । "असे एक संस्कृत सुभाषित आहे. त्याप्रमाणे माणसाने खरे बोलावे आणि लोकांना रुचेल असे बोलावे. कटु सत्य सांगू नये आणि खोटेही बोलू नये. पण अनेक वेळा अशी परिस्थिती येते की हा उपदेश पाळणे केवळ अशक्य आहे असे वाटते.
आमच्या देशपांड्यांचा आप्तेष्ट आणि मित्रपरिवार इतका मोठा आहे की एका लग्नसराईच्या महिन्या दीड महिन्यात त्यांना १५-२० निमंत्रणे आली. आता इतक्या सगळ्या जागी कसे काय जाणार ? राजाभाऊंच्या सचिनचे लग्न तर दूर भिवंडीला होते. एरवी त्यांचे आपसांत फारसे जाणे येणेही नव्हते. त्यामुळे देशपांड्यांनी या लग्नाला जायचा कंटाळा केला आणि त्या ऐवजी शिवाजी मंहिरात एक झकास मराठी नाटक पाहून रविवारची सुटी सत्कारणी लावली. जोशीबुवांनीसुध्दा नेमके तेच केले.
त्यानंतर दोनतीन दिवसांनी देशपांड्यांना रस्त्यात कुठेतरी कुलकर्णी भेटले. ते तर सचिनचे सख्खे मामा. स्पष्टपणे खरे बोलून उगाच त्यांना दुखवायला नको म्हणून देशपांड्यांनी सांगून दिले, "अहो, मिसेसला एकदम थंडी वाजून जोरात ताप भरला आणि डॉक्टरकडे न्यावं लागलं. त्यामुळे आम्हाला सचिनच्या लग्नाला यायला कांही जमलं नाही." योगायोगाने कांही कामानिमित्त मिसेस देशपांड्यांचे मिसेस कुलकर्ण्याशी टेलीफोनवर बोलणे झाले. त्यात त्यांनी मिस्टर देशपांडे अचानक टूरवर गेल्याचे निमित्त सांगितले. हे क्षुल्लक संभाषण एकमेकांना सांगावे असं दोन्ही पतिपत्नींना वाटले नाही.
त्यानंतर सातआठ दिवसांनी पाटलांच्या गिरीशच्या लग्नात दोन्ही दांपत्ये भेटली. मिसेस कुलकर्ण्यांनी मिस्टर देशपांड्यांना त्यांचा प्रवास कसा झाला असे विचारले तर मिस्टर कुलकर्ण्यांनी मिसेस देशपांड्यांच्या नाजुक प्रकृतीची विचारपूस केली. दोघेही गोंधळलेल्या स्थितीत असतांनाच जोशी मंडळी तेथे आली. जोशीबुवांना कुणासमोर काय बोलावे याचा पोच तसा कमीच. आज तर त्यांच्या अंगात सत्यवादी हरिश्चंद्राचा संचार झाला होता. त्यांनीच सुरुवात केली,"हा हॉल किती छान आहे नाही? नाही तर आपल्या त्या कंजूस राजाभाऊंनी कुठलं आडगांवातलं कार्यालय शोधून काढलं होतं? नाहीतरी असल्या खडूस लोकांच्या घरच्या कार्याला कोण जातंय् म्हणा? आम्ही तर मस्तपैकी एक मराठी नाटक पाहिलं." एवढ्यावर न थांबता देशपांड्यांचेकडे अंगुलीनिर्देश करीत त्यांनी बॉम्बस्फोट केला."हे लोकसुध्दा तिथंच आलेले."
अर्थातच कुलकर्ण्यांनी रुद्रावतार धारण करून सर्वांनाच धारेवर धरले. केवळ त्यांना दुखवू नये म्हणून देशपांडे खोटं बोलले आणि गोत्यात आले. तर स्पष्टपणे खरे बोलल्यामुळे जोशांची खरडपट्टी झाली. म्हणजे दोन्ही पर्याय चुकीचेच. मग माणसालं करावं तरी काय? हे नाट्य घडत असतांनाच गोडबोल्यांनी एन्ट्री घेतली, "अरे वा! कुलकर्णी, देशपांडे आणि जोशी एकत्र! अलभ्य लाभ!" पण कुणीच टाळी देण्याच्या मूडमध्ये नव्हते. जोशांनी खंवचटपणेच विचारलं, "सचिनच्या लग्नाला तुम्ही गेलाच असाल ना?" "सचिन म्हणजे आपल्या राजाभाऊंचा ना? अहो राजाभाऊ म्हणजे अगदी राजा माणूस बरं. एवढा मोठा माणूस, पण कणभरसुध्दा आढ्यता नाही हो त्यांच्या वागण्यात! त्यांनी आठवणीनं प्रत्यक्ष फोन करून आम्हाला अगत्यानं बोलावलं तेंव्हा अगदी धन्य वाटलं हो! लग्नात तर त्यांनी धमाल उडवून दिली असणार. किती हौशी स्वभाव आहे ना त्यांचा? खूप लोक आले असतील ना? कोण कोण आले होते हो?" "श्रीकाका, सुधामावशी, करुणा, कविता ..." सौ.कुलकर्णी सांगायला लागल्या. पण त्यांना मध्येच अडवत जोशांनी शेरा मारला,"म्हणजे गोडबोले, तुम्ही नव्हतातच!" "अहो आम्ही नक्की जाणारच होतो. म्हटलं त्यानिमित्तानं सगळ्यांच्या भेटीगाठी होतील. मुख्य म्हणजे तात्यासाहेबांची भेट होईल. अहो भेट काय म्हणतोय मी ? दर्शन घडेल म्हणायला हवं. अहो काय त्यांची विद्वत्ता? वाक्यावाक्यागणिक संस्कृत श्लोक, ज्ञानेश्वरांच्या ओव्या, तुकारामाचे अभंग आणखी कुठकुठली इंग्रजी कोटेशन्स यांची नुसती लयलूट! आता त्यांचं वय ऐंशीच्या घरात तरी असेलच. पण स्मरणशक्ती अगदी तल्लख बघा..." गोडबोले सांगत होते. त्यांच्या गाडीला ब्रेक लावत जोशांनी विचारलं, "अहो,सचिनच्या लग्नाला तुम्ही का गेला नव्हता ते सांगत होतात. त्याचं काय झालं?" "त्यांना नसेल सांगायचं तर जाऊ द्या ना." देशपांड्यानाही या विषयातून बाहेर पडायचंच होतं. "छे हो! ते एवढ्या आपलेपणानं विचारताहेत तर सांगायलाच हवं. आपल्या लोकांबरोबर कशाला लपवाछपवी करायची? गोडबोल्यांनी उत्तर दिलं."तसं तुम्हा लोकांना सगळं माहीतच आहे म्हणा. आपलं मुंबईचं काय लाईफ आहे? नुसतं ऑफीसला जाऊन परत घरी येण्यातच अख्खा दिवस संपून रात्र होते. त्याशिवाय घरी, सोसायटीमध्ये आणि ऑफीसात किती प्रकारच्या इतर एक्टिव्हिटीज् सतत सुरू असतात त्यालाही वेळ द्यावा लागतो. शिवाय येणारे जाणरे, पाहुणे रावळे असतात..." "पण सचिनचं लग्न मुद्दाम रविवारी ठेवलं होतं, तुमच्या राजाभाऊंनी." जोशांनी शब्दात पकडायचा प्रयत्न केला. "मी तेच तर सांगत होतो. इतर दिवस कसे पहाता पहाता निघून जातात, त्यामुळे रविवारी करायच्या कामांची ही मोठी यादी तयार होते. कशाची दुरुस्ती, कुठली चौकशी, कसलं बुकिंग, कोणची खरेदी वगैरे वगैरे. त्यशिवाय लग्नं, मुंजी, बारशी, वाढदिवस, सत्कार किंवा निरोप समारंभ वगैरे कांही ना कांही कार्यक्रम होतच असतात. रविवार तरी अगदी मोकळा कधी असतो?" गोडबोले. "मागच्या रविवारी त्यातला कुठला प्रॉब्लेम आला?" जोशांची चिकाटी वाखाणण्याजोगी होती. "छे हो, प्रॉब्लेम कसला आलाय्? हे सगळं आपण आपल्याच हौसेनं करतो आणि त्यातून आपल्यालाच कांही ना कांही मिळत असतं. मग उगाच त्याला प्रॉब्लेम कशाला म्हणायचं? आता कुठल्या दिवशी काय काय करायचं ठरवलं होतं, त्यातलं किती झालं नि किती राहून गेलं हे कुठवर लक्षात ठेवायचं हो? त्यापेक्षा आज काय करायचं ते जास्त महत्वाचं. म्हणून दुसरी सगळी कामं बाजूला ठेऊन आज इथंच यायचंच असं ठरवलं. अहो त्यामुळे सगळ्यांच्या भेटी होतात. आणि इथल्या वातावरणातच किती चैतन्य भरलंय्? त्यातून एक प्रकारची एनर्जी मिळते असं वाटतं ना? खरंच तुम्ही लोक कुठला ज्यूस घेणार? ऑरेंज, ग्रेप्स का पाईनॅपल? फॉर ए चेंज टोमॅटो ट्राय करणार? मी वेटरला पाठवून देतो हं." असं म्हणत गोडबोले अंतर्धान पावले. कुणीतरी लाऊडस्पीकरवर गाणं लावलं होतं, "बोला, अमृतं बोला, शुभसमयाला गोड गोड बोला"----------------------------------------------------------------------

No comments: