Thursday, March 06, 2008

बोलू ऐसे बोल (भाग३)

गोड बोलत बोलत आपला उद्देश साध्य करण्यासाठी लोक बोलतांना काय काय तरी युक्त्या लढवतात? चिंतोपंत त्याच्या चिकटपणाबद्दल प्रख्यात होते. विशेषतः आपली कुठलीही वस्तू इतर कुणाला वापरू देणे त्यांना अजीबात आवडत नसे. त्यांचे जवळच राहणारे बंडोपंत त्यांच्या बरोबर उलट स्वभावाचे होते. 'हे विश्वचि माझे घर' असे समजून त्यांचा सर्वत्र संचार असायचा, आपल्याकडील सगळ्या कांही वस्तू ते कुठल्याही गरजवंताला निस्संकोचपणे वापरायला देत. तसेच इतर कुणाचीही कुठलीही वस्तू हक्काने वापरायला त्यांना मुळीच संकोच वाटत नसे.
एके दिवशी सकाळीच बंडोपंतांना स्वतःच्या घराकडून निघून आपल्या घराच्या दिशेने येत असतांना चिंतोपंतांनी खिडकीतून पाहिले. आता ही ब्याद आपल्या घरी असलेल्या सगळ्या वस्तू पाहणार आणि त्यातील कांही तरी नक्की मागून नेणार. मैत्री आणि शेजारधर्म यामुळे त्यावर आपल्याला नाही म्हणता येणार नाही या विचाराने ते चिंतातुर झाले. आज आपण त्यांना कांहीही द्यायचे नाही, त्यांनी एकादी वस्तू मागितलीच तर ती आपल्याकडे नाही किंवा कुणाला तरी आधीच दिली आहे असे सांगायचे असे त्यांनी ठरवले. कोणतीही वस्तू त्यांच्या नजरेलाच पडू नये यासाठी त्याला घरातच घुसू द्यायचे नाही या विचाराने ते लगबगीने बाहेर अंगणात आले. तिथेच पडलेले एक खुरपे हांतात घेऊन एका कोप-यात जमीन उकरू लागले. अपेक्षेप्रमाणे बंडोपंत बाहेरचे गेट उघडून अंगणात आले. त्यांनीसुद्धा चिंतोपंतांच्या हालचाली नजरेने टिपल्या असाव्या. आल्या आल्या विचारले, "काय चिंतोपंत, आज सकाळी सकाळीच बागकामाला सुरुवात केली वाटतं?"
चिंतोपंतांनी सांगितलं, "हो ना, बरेच दिवसांपासून हे काम पडून राहिलं होतं. आज विचार केला की गवत वाढले आहे आणि तण उगवले आहेत ते जरा काढून टाकावेत आणि फुलझाडांच्या खालची माती खणून थोडी भुसभुशीत करावी. अहो बाग लावायची म्हणजे काय कमी कामं असतात कां?"
बंडोपंत,"हे मात्र खरं हं. तुम्ही आहात म्हणून हे सगळं व्यवस्थित करता हो. मला पण तुमच्याकडून हे काम थोडं शिकायचंय्. आमची काय संन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून तयारी म्हणतात ना त्यातली गत. अहो साधं खुरपं सुद्धा नाही बघा आमच्याकडे. खरंच तुमचं खुरपं किती छान दणकट आहे हो? त्याचा दांडा क्ती नसुरेख आहे ना ? अशी खुरपी तर आजकाल कुठे पहायला सुद्धा मिळत नाहीत."
चिंतोपंत,"अहो म्हणून तर आम्ही हे खुरपं मुद्दाम गांवाकडच्या लोहाराकडून खास बनवून घेतलंय् आणि व्यवस्थित संभाळून ठेवलंय्. मी कधी ही ते दुस-या कुणाच्या हातात देत नाही."
बंडोपंत, "पण मला मात्र तुम्ही मुळीच नाही म्हणणार नाही याची खात्री आहे. वाटलं तर अगदी तुमच्या नजरेखाली ते काळजीपूर्वक चालवीन. म्हणजे काय आधी मी फक्त दहा पंधरा मिनिटे चालवून बघेन. जमतय् असं वाटलंच तर एक दोन दिवसात मी बाजारातून मिळेल ते नवीन खुरपं आणीनच ना! आता ते तुमच्या खुरप्याइतकं चांगलं असणार नाही म्हणा, पण आपलं काम तर भागून जाईल. नाही कां?"
चिंतोपंत," अहो, आज तर मी दिवसभर माझ्या बागेत काम करणार आहे. मला मुळीसुद्धा वेळ नाही."
बंडोपंत, "पण मध्ये थोडी विश्रांति घ्यायला, चहा प्यायला तर उठाल ना? आज आमच्याकडेच पिऊ."
चिंतोपंत, "छे! छे! आज काम म्हणजे काम! चहाही इथेच बसून घेणार आणि वाटलं तर जेवणसुद्धा!"
बंडोपंत, "थोडं फिरायला जाणार असाल. झालंच तर भाजी आणायची असेल, वाण्याकडचं सामान आणायला जाणार असालच ना?"
चिंतोपंत, "आज कांही म्हणजे कांही नाही. सगळं सामान कालच आणून ठेवलंय् आणि इथेच मोकळ्या हवेत काम केल्यावर पुन्हा बाहेर मुद्दाम फिरायला जायची काय गरज आहे?"
बंडोपंत, "म्हणजे आज दिवसभरात तुम्ही कुठेही जाणार नाही, इथेच बसून काम करीत राहणार हे अगदी नक्की तर?"
चिंतोपंत, "नक्की म्हणजे काय अगदी काळ्या दगडावरची रेघ समजा."
बंडोपंत, "अहो त्याचं काय आहे की मला थोडं स्टेशनपर्यंत जाऊन यायचं होतं. तसं ते अंतर जरा लांबच आहे, कसं जावं ते कांही समजत नव्हतं. तुम्हाला विचारावं तर वाटायचं उगाच तुमचा खोळंबा व्हायचा. आता तुम्हाला कुठं जायचंच नाही म्हंटल्यावर हे मात्र फारच चांगलं झालं हं. तेंव्हा थोड्या वेळासाठी तुमची ही सायकल वापरायला घेऊ ना?"
(क्रमशः)

No comments: